Breaking News

औंध परिसरात इंटरनेट सेवेचा बोजवारा

औंध (प्रतिनिधी) : औंधसह परिसरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना कॉलिंग करताना तसेच इंटरनेट सेवा वापरताना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना विविध प्रकारच्या योजनांची प्रलोभने दाखवून आपल्याकडे ग्राहक वर्ग खेचण्यासाठी मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र या सेवेचे औंध परिसरात तीन तेरा वाजले असून बोजवारा उडाला आहे.

औंधसह परिसरातील सुमारे पंधरा गावांचा औंधशी नियमित संबंध येतो. त्यामुळे सुमारे बारा ते पंधरा हजार खाजगी मोबाईल ग्राहकांची संख्या याठिकाणी आहे. नियमित येणारे भाविक, पर्यटक यांचीही मोबाईल वापरणारांची संख्या जास्त आहे. पण खाजगी कंपन्यांकडून नियमित म्हणावी तशी सेवा दिली जात नाही. ग्राहकांना ऑफर एक अन् सेवा वेगळयाच दर्जाची दिली जात आहे. फोरजी सेवा तर फक्त कागदावर आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे मागणी करून ही यात सुधारणा झालेली नाही. त्यांच्याकडून ग्राहकांना आश्‍वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही. सध्या मूळपीठ डोंगरावरील एकाच टॉवरवर चार ते पाच वेगवेगळ्या कंपन्यांची यंत्रणा बसवली आहे. मोबाईल कंपन्यांकडून नियमित लाखोंचा महसूल गोळा केला जात आहे. पण सेवेच्या नावाने शिमगा सुरू आहे. अनेक वेळा कॉल ड्रॉप होण्याचे प्रकार ही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून खाजगी मोबाईल सेवेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत त्वरित सुधारणा करण्याची मागणी मोबाईल ग्राहकांमधून केली जात आहे.

खाजगी मोबाईल कंपन्यांकडून प्रत्यक्षात फोरजी स्पीडचे पैसे घेतले जातात. मात्र ग्राहकांना टुजी किंवा थ्रीजी स्पीडच इंटरनेटसाठी मिळत आहे. त्यातच औंंध येथे शासकीय संस्था व अन्य कार्यालये आहेत पण पाहिजे तेव्हा नेमके संबंधित कंपन्यांचे नेटवर्क दगा देत आहेत. ग्राहक संख्या जास्त व यंत्रणा अपूर्ण असल्याने अल्प क्षमतेत नेटवर्क मिळत आहे. याठिकाणी तात्काळ आवश्यक क्षमतेची यंत्रणा उभी करुन उच्च दर्जाची सेवा देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाला की, इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडत आहे. यावरही कंपन्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नुकतीच औंध येथील श्रीयमाईदेवी यात्रा पार पडली. याकालावधीत येथे मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉप होणे, इंटरनेट सेवा बंद पडणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे औंध भागातील हजारो ग्राहकांना याचा फटका बसत असून मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल सेवेच्या अनियमिततेचा येथील धार्मिक व पर्यटन विकासालाही फटका बसू लागला आहे. त्यामुळे संबंधीत मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.