Breaking News

मायावतींना ‘सर्वोच्च’ दणका; पुतळा उभारण्यासाठी झालेला खर्च देण्याचे आदेश; लोकसभेअगोदर झटका


नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मायावती यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये उभारलेल्या पुतळ्यांसाठी खर्च झालेले पैसे परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 2009 मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हा आदेश दिला आहे.


मायावती यांनी उभारलेल्या पुतळ्यांवर जनतेचा पैसा खर्च करण्यात आल्याचा आरोप करत 2009 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तब्बल दहा वर्षांनी या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले, की प्राथमिकदृष्ट्या मायावती यांना पुतळे उभारण्यासाठी खर्च केलेले जनतेचे पैसे परत द्यावे लागणार आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार आहे. त्याआधी मायावती यांनी हा सर्व पैसा परत केला पाहिजे. मायावती यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार्‍या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी मे महिन्यानंतर घ्यावी, अशी मागणी केली; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली.

मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये पक्षाचे चिन्ह असलेला हत्ती आणि आपले स्वत:चे अनेक पुतळे उभा केले आहेत. मायावती यांनी उभारलेल्या पार्क आणि महापुरुषांच्या स्मारकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्याही पुतळ्यांचा समावेश आहे. मायावती यांनी हे पुतळे उभारण्याचे काम हाती घेतल्यानंतर समाजवादी पक्षासह अनेक संघटनांनी त्याला विरोध केला होता; परंतु सर्वांचा विरोध डावलून त्यांनी हे पुतळे उभे केले होते.

एका वकिलाने मायावती यांच्या पुतळा उभारण्याच्या खर्चाला आव्हान दिले होते. याचिकेत मागणी करण्यात आली होती, की नेत्यांनी स्वतःचे आणि पक्षाच्या चिन्हांचे पुतळे उभारण्यासाठी जनतेचा पैसा खर्च न करण्याचे निर्देश द्यावेत. 2007 ते 2011 दरम्यान उत्तर प्रदेशच्या मायावती यांनी लखनऊ आणि नोयडामध्ये दोन उद्याने तयार केली होती. त्यामध्ये मायावती यांनी त्यांचा स्वतःच्या पुतळ्यासह, बसपचे संस्थापक कांशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तींचे अनेक पुतळे उभारले होते. त्यावर 1400 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला होता. हत्तीचे दगडाचे 30 तर ब्राँझचे 22 पुचळे लावले होते. त्यावर 685 कोटी खर्च झाले होते.


सहा हजार कोटींपेक्षा जास्त खर्च

मायावती यांनी पुतळे, बागा व स्मारकांवर अक्षरशः हजारो कोटी रुपयांची उधळण केली. सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. लोकांचे आरोग्य, शिक्षण, सिंचन, वीजनिर्मिती आदीवर खर्च करण्यापेक्षा अनुत्पादक बाबींवर खर्च करून त्यांनी त्याचे समर्थनही केले होते. त्यासाठी सरकारी कार्यालये जमीनदोस्त करण्यात आली होती.