Breaking News

ऐतिहासिक सज्जनगडाच्या तटबंदीचा ठेवा धोक्यात


सज्जनगड (प्रतिनिधी) : ऐतिहासिक सज्जनगडाची तटबंदी ढासळू लागली असून हा ऐतिहासिक ठेवा कालबाह्य होण्याचा धोका व्यक्त होत आहे. सातत्याने मागणी करूनही गडाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आता तर यात्रा अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. गडावर दासनवमी महोत्सवाची तयारीही सुरू असल्याचे चित्र असताना प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपंचायत गडावरील दोन्ही संस्थांना भाविकांच्या सुरक्षिततेचा विसर पडला की काय? तटबंदी दुरुस्तीला मुहूर्त कधी मिळणार? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

सज्जनगडाला धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे. अलिकडच्या काळात सज्जनगडाची दूरवस्था होवू लागली आहे. पावसाळी दिवसात तटबंदी कोसळून पायरी मार्गावरील भाविकांची वाहतूकही बंद होती. या तटबंदीची दुरुस्ती पावसाळा संपल्यावर करण्यात येईल, असे त्यावेळी संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, पावसाळा संपून चार महिने लोटले तरीही त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

सज्जनगड परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी होत असते. यामुळे रस्त्यावर दरड कोसळणे असे प्रकार वारंवार होत असतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे असूनही दुर्लक्ष केले जाते. सज्जनगडावर पहिल्या महाद्वाराजवळच्या बुरुजाला जोडलेला भाग अतिवृष्टीने ढासळला. यानंतर जवळ जवळ महिनाभर यातील मोठमोठे दगड ढासळत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला गेला. पाऊस कमी आल्यावर ढिगारा हटविण्यात आला. मात्र, यापुढे कायमस्वरूपी अशी कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. आता तर परळी पायरी मार्गाच्या बाजूला असलेल्या कड्यांवरील काही भाग ढासळला आहे.

उत्सवात किंवा गर्दीच्या वेळी काही अतिउत्साही पर्यटक भाविक या परिसरात फोटोसेशनसाठी, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी या कड्यावर जातात. यातून दुर्घटनेची दाट शक्यता आहे. याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. गडावरील अनेक ऐतिहासिक बाबी काळाच्या ओघात गडप होवू लागल्या आहेत. त्यामुळे इतिहास प्रेमी व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. महाद्वाराच्या तटबंदीसाठी उपाययोजना करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पर्यटक, भाविक व समर्थ भक्तांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.