Breaking News

शहरात महापालिका दोन वेळा स्वच्छता करणार : आ. जगताप


अहमदनगर/प्रतिनिधी - “पूर्वी शहरात दोन वेळेस दैनंदिन स्वच्छता केली जात होती त्याच पध्दतीने आता यापुढील काळातही सकाळी 5 तास व दुपारी 3 अशी स्वच्छता करण्यात यावी, कचरा वाहतूक करणार्‍या ज्या गाड्या नादुरूस्त होऊन बंद आहेत, त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, कचरा उचलण्याची सर्व यंत्रणा सज्ज करावी, अधिकार्‍यांनी कार्यालयातच न बसता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन निरीक्षण करावे, विविध विभागात अचानक भेटी द्याव्यात त्यामुळे कामचुकारपणा होणार नाही, अधिकार्‍यांनी इतरांवर जबाबदार्‍या ढकलण्याऐवजी दिवसातील एक तास इतर विभागाचे काम करावे’’, अशा सूचना आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या.

शहरातील कचरा कोंडी प्रश्‍नी आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.6) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला होता. या मोर्चाच्या वेळी शहरातील साफसफाई व कचरा उचलण्याबाबत नियोजन करण्यासाठी आ. संग्राम जगताप व नगरसेवकांच्या समवेत सर्व अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन उपायुक्त सुनील पवार यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.8) सकाळी 11 वा. ही बैठक सुरू
झाली. त्या बैठकीत अधिकार्‍यांना सूचना देताना आ.संग्राम जगताप बोलत होते.

यावेळी आ. संग्राम जगताप, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, डॉ. सागर बोरूडे, प्रकाश भागानगरे, सुनील त्रिंबके, बाबासाहेब गाडळकर, अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, सारंग पंधाडे, नितीन लिगडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त सुनील पवार, प्रदीप पठारे, लेखाधिकारी श्री. मानकर, शहर अभियंता विलास सोनटक्के, पुरवठा
विभागाचे परिमल निकम, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ.एन.एस. पैठणकर यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

शहरात स्वच्छतेचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. शहर स्वच्छतेचा ठेका खाजगी संस्थेला देण्याचा विचारही सुरू असून त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी सांगितले.


बैठकीत ठरल्यानुसार कामाचे नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. “या बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा पुन्हा जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी आ. संग्राम जगताप यांनी दिला तसेच बैठकीतील निर्णयाचे इतिवृत्त सर्व उपस्थित नगरसेवकांना देण्यात यावे’’, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.