Breaking News

राज्यातील 178 तालुक्यांत तीव्र पाणीटंचाईअहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

भूजल पातळी खालावल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र

अहमदनगर : राज्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने आता उन्हाळ्याच्या तीव्रते बरोबरच पाणी टंचाईच्या झळा देखील वाढू लागल्या आहेत. पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, 358 पैकी 178 तालुक्यांतील 5,614 गावांमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) अहवालानुसार या गावांतील भूजल पातळीत 1 ते 2 मीटरने घट झाल्याने पाण्याचे स्रोत आटत आहेत. टंचाई निवारणार्थ शासनाने कृती आराखडा आखून उपाययोजना राबविणे सुरू केले असले, तरी निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून (जीएसडीए) वर्षातून चारवेळा सर्वेक्षण करण्यात येते. राज्यातील स्थिर भूजल पातळीच्या नोंदी घेण्याकरता पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरी निश्‍चित केल्या जातात. या विहिरींतील स्थिर भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या असता 3,460 गावांमध्ये भूजल पातळीत 2 ते 3 मीटरने, तर 3,535 गावांमध्ये 3 मीटरने घट झाल्याचे आढळले. भूजल पातळीत 1 ते 2 मीटरने घट नोंदवण्यात आलेल्या तालुक्यांत नाशिक विभागातील 1432, पश्‍चिम महाराष्ट्रातील 704, मराठवाड्यातील 1,515, विदर्भातील 1,963 गावांचा समावेश आहे. कोकणात एकाही गावात पाणीटंचाई नाही.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस नगर जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणा-या टँकरचा आकडा 620 पर्यंत पोहोचला आहे. मागील 17 वर्षांच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अधिक असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील टँकरच्या संख्येचा मागील 17 वर्षातील उच्चांक या वर्षी होणार आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 2002 ते 2018 या कालावधीत आतापर्यंत 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजे 826 टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा करावा लागला होता.प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 2011 मध्ये जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे पाण्यासाठी केवळ 22 टँकर सुरू करावे लागले होते.मागील 17 वर्षांमध्ये तीन वेळा टँकर ने 600 चे आकडा पार केला होता. यंदा कोकण विभाग वगळता उर्वरित भागात पावसाची सरासरी तुलनेने कमी राहिली. उपसा वाढत असतानाच जल पुनर्भरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीपातळीतील घट कमी झाल्याचा शासकीय दावा आहे. मात्र, ज्या गावांत जलयुक्त शिवारची कामे झालीत, त्याही गावांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाल्याने या दाव्यातील हवा निघाली आहे. जलस्रोत आटत असल्याने नागरिकांची भटकंती सुरू असून जनावरांचेही अतोनात हाल होत आहेत.

विभागनिहाय टंचाईग्रस्त तालुके

अमरावती 10, अकोला 1, यवतमाळ 9, बुलडाणा 12, नागपूर 4, वर्धा 6, चंद्रपूर 8, नाशिक 9, धुळे 3, जळगाव 13, नगर 11, नंदूरबार 5, पुणे 7, सोलापूर 11, कोल्हापूर 1, सांगली 5, सातारा 4, औरंगाबाद 9, बीड 11, जालना 7, परभणी 8, नांदेड 5, उस्मानाबाद 7, लातूर 7.

नगर जिल्ह्यात 858 गावांमध्ये पाणीटंचाई

यंदाच्या पावसाळ्यात नगर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे 858 गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागा ने सुरूवातीलाच व्यक्त केला होता. मात्र या उलट अल्प पावसाने ग्रामीण भागातील पाणी पातळीत वेगाने घट झाली आहे. तसेच पाण्याचे उदभव देखील कोरडे पडले आहेत.त्यामुळे पाणी टंचाई असलेल्या गावांच्या संख्येत सात त्या ने वाढ होतांना दिसत आहे. मार्च महिना अखेरीस जिल्ह्यातील 416 गावे व 2 हजार 300 वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना 620 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एप्रिल, मे व जून या पुढील तीन महिन्यां मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक भीषण होणार असून टँकरची संख्या 1 हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.