Breaking News

सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र कुस्ती महावीर 2019 किताबाचा मानकरी

Image result for महाराष्ट्र कुस्ती महावीर 2019

सोलापूर : सोलापूर येथील सिकंदर शेख यांनी पुणे येथील शैलेश शेळके याचा पराभव करुन महाराष्ट्र कुस्ती महावीर 2019 हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये 71,000/- रोख, चांदीची गदा व सुवर्णपदक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक - दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा - 2019 रामेश्‍वर (रूई), ता.जि. लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पुणे येथील शैलेश शेळके यांनी उपविजेते पद मिळविले . त्यांना रौप्यपदक व रोख रुपये 51,000/- चे पारितोषिक देण्यात आले. पुणे येथील अनिल जाधव याला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये 31,000/- रोख व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण 250 मल्लांनी भाग घेतला होता. विजेता पै. सिंकदर शेख म्हणाला, रामेश्‍वर येथे भरविण्यात येणार्या महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा या महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी यांच्या तोलामोलाच्या आहेत. या स्पर्धांमुळे महाराष्ट्रातील मल्लांना आंतरराष्ट्रीय किर्तीचा मल्ल घडण्यासाठी संधी मिळते. या स्पर्धेत मी पहिल्यांद सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतील विजयामुळे मला खूप बळ मिळाले. ऑलंम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करण्याचे व आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे.