Breaking News

रेहेकुरी वनपरिक्षेत्रातील गैरप्रकारांकडे अधिकार्‍यांची डोळेझाक


कर्जत/प्रतिनिधी: वनक्षेत्र तसेच वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून वन अधिनियम करण्यात आलेले आहेत. वन अधिकार्‍यांनी अधिनियमांचे पालन करून आपल्या भागातील वनक्षेत्र रक्षण करण्याचे काम आहे. मात्र, पुणे वन्यजीव विभागाअंतर्गत कारभार चालत असलेल्या रेहेकुरी काळवीट अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार शासनाचे वन अधिनियम धाब्यावर बसवून सुरू आहे. 

वनक्षेत्रातील वृक्षतोड रोखणे, मोकाट जनावरांना प्रतिबंध करणे, वन्यप्राण्यांची शिकार, तस्करी रोखणे, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे रोखणे आदींबाबत महाराष्ट्र शासनाच्यावतीने वन अधिनियम व कायदे करण्यात आले आहेत. मात्र, हे नियम व कायदे यांच्याकडे डोळेझाक केले जात असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची वनसंरक्षक कार्यालयाकडून दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

रेहेकुरी अभयारण्य सर्रासपणे वृक्षतोड होत असून वन्यजीवांची जोरदार तस्करी सुरू आहे. मोकाट जनावरांच्या वावरामुळे जंगले खुरटी बनली आहेत. तर वन्यप्राण्यांची चारा पाण्याच्या शोधार्थ लोकवस्तीत भटकंती सुरू आहे. जंगलाबाहेर आलेल्या हरीण काळवीट यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. वनक्षेत्रात अतिक्रमणे करून रस्ते पडलेले आहेत. त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. या प्रकारामुळे वन्य प्राणी भयभीत होत असल्याचे चित्र दिसून येते. वनक्षेत्रात मोकाट जनावरे वावरत असताना त्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे जनावरांसाठी बांधलेल्या कोंडवाड्यांचाही वापर होत नाही. या प्रकाराबाबत वन अधिकार्‍यांकडून कसलीच कारवाई होत नसल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वनविभागाचे कडक कायदे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी अंमलबजावणी अभावी निकामी केले आहेत.

रेहेकुरी कार्यालयात नियमांचा भंग

वनविभागाचे अधिनियम म्हणजे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी केलेली घटना आहे. या घटनेचे पालन करणे ते कर्मचार्‍यांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, रेहेकुरी अभयारण्य कार्यालयात नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकाराची दखल घ्यावी.- भास्कर भैलुमे जिल्हा कार्याध्यक्ष, आरपीआय