Breaking News

रारंगढांग कांदबरीवरील ध्वनीफितीला प्रतिसाद


सातारा,  (प्रतिनिधी) : येथील मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने सलग सातव्या वर्षी मराठी भाषा पंधरवडयाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्याअंतर्गत नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे प्रभाकर पेंढारकर यांच्या कांदबरीवर आधारित रारंगढांग हा ध्वनीफित कार्यक्रम वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सादर केला, त्यास सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रारंभी त्यांनी प्रभाकर पेंढारकर यांनी तयार केलेला बॉर्डर रोड हा लघुपट दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी कादंबरी कशी लिहिली याबाबत माहिती सांगितली. एरव्ही पहिल्यांदा कादंबरी लिहिली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर चित्रपटाची निर्मिती होती परंतु रारंगढांग या कादंबरीबाबत मात्र उलटे आहे. प्रभाकर पेंढारकर यांनी लघुपटाची निर्मिती केली आणि त्यानंतर जवळपास 3 वर्षांनी कादंबरी लिहिलेली. यावेळी वंदना बोकील-कुलकर्णी यांनी लघुपटातील स्लाईडस आणि कादंबरीमधील प्रसंगांत काही प्रमाणात साम्य कसे आहे याचे विवेचन केले.

मसाप शाहुपुरी शाखेचे कार्यवाह डॉ. उमेश करंबेळकर यांचा वाढदिवसानिमित्त आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विनोद कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. या पंधरवडयातील पुढील कार्यक्रम 9 मार्च रोजी होणार असून पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त अभय देवरे आणि वनराज कुमकर हे पुलंचा बटवा हा कार्यक्रम नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता सादर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपूरी शाखेतर्फे देण्यात आली आहे.