Breaking News

महाबळेश्वरच्या रुग्णालयास पाच लाखांचा धनादेश


महाबळेश्र्वर / प्रतिनिधी : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्र्वर येथे गेल्या काही वर्षांपासून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला होता. याचा गांभीर्याने विचार करून शासनाने येथील ग्रामीण रुग्णालय पीपीपी’ अन्वये बेल एअर हॉस्पिटलला वर्ग केले आहे. मात्र, तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व उपकरणे उपलब्ध करण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता लक्षात घेऊन महाबळेश्र्वर हॉटेल असोसिएशनने बेल एअर हॉस्पिटल समूहाचे प्रमुख फादर टॉमी यांच्याकडे नुकताच पाच लाख रुपयांचा धनादेश सोपवला. महाबळेश्वरवासियांसह पर्यटकांना आधुनिक सेवा उपलब्ध करण्यासाठी या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्याचे आश्र्वासन फादर टॉमी यांनी दिले.

महाबळेश्र्वर येथील ग्रामीण रुग्णालयात मिळणार्‍या सेवा अल्प प्रमाणात व असमाधानकारक असल्याने बर्‍याचदा स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, महाबळेश्र्वर तालुक्याचे सुपुत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रिपदी निवड होताच त्यांनी या प्रश्र्नात लक्ष घातले. स्थानिकांच्या मागणीनुसार ग्रामीण रुग्णालय पीपीपी’ अन्वये खासगी तत्त्वावर येथील बेल एअर हॉस्पिटलला वर्ग केले. मात्र, तेथे अत्यानुधिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची गरज होती. बेल एअर व्यवस्थापनाने आपल्या कुवतीनुसार काही दुरुस्ती करून ग्रामीण रुग्णालयाचे रूपडे बदलण्यास सुरुवात केली तरी आयसीयू युनिट, अद्ययावत प्रयोगशाळा आणि इतर तातडीच्या सेवांसाठी निधी उपलब्ध करण्यास स्थानिक हॉटेल व्यावसायिक सरसावले. महाबळेश्र्वर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष कैलेश तेजानी, उपाध्यक्ष रिचर्ड डायस, खजिनदार हारमूज महाबळेश्र्वरवाला, हॉटेल लेक व्ह्यूचे प्रदीप झवेरी व असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आज बेल एअरचे सर्वेसेवा फादर टॉमी यांच्याकडे पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्त केला.

यापुढेही महाबळेश्र्वरवासीय आणि पर्यटकांना अद्ययावत रुग्णसेवा मिळाव्यात यासाठी आवश्य ती सर्व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची तयारी असोसिएशनने दाखवली. फादर टॉमी यांनी असोसिएशनच्या सभासदांचे आभार मानले. शासन नियमांतर्गत सर्वोत्तम रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याचे अभिवचनही फादर टॉमी यांनी दिले.