Breaking News

दुष्काळातही मिळेना परीक्षा शुल्क माफी


उंब्रज / अनिल कदम : बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थी यांना दहावी, बारावीची परीक्षा शुल्कामध्ये माफी देण्याची उपाययोजना जाहीर करण्यात आली. परंतु, सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीप्रमाणे दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या तरी याबाबतचा आदेश शाळांना मिळालेला नाही, अशा बतावण्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा करू लागल्या आहेत.दहावी बारावीचा परीक्षा फॉर्म भरताना सुमारे 500 रुपये बोर्डाला भरावे लागत होते. 

दुष्काळग्रस्त भागातून शेकडो विद्यार्थी या सवलतीस पात्र ठरले आहेत.आणि सरकार सुद्धा फी परत करण्यासाठी तरतूद केली आहे, असे सांगत आहे.शेकडो कोटीचे असणारे हे गणित नक्की सोडवणार कोण, शाळा की जिल्हा प्रशासन? याबाबत संभ्रमावस्था आहे. राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची (इ.10 वी व 12 वी) परीक्षा फी माफी योजनेसाठी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता ही महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शैशुमा-2018/प्र.क्र.132/एसडी-5 दि 05/03/2018 जून ते सप्टेंबर या कालावधीतील 151 तालुक्यामध्ये गंभीर/ मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना लागू करण्यास मंजूरी देण्यात आली होती. तसेच दिनांक 6 नोव्हेंबर,2018 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्याव्यतिरीक्त इतर तालुक्यातील ज्या मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीतील एकूण 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन विविध उपाययोजना लागू करण्यास मंजूरी देण्यात आली होती.

वित्त विभागाच्या दिनांक 25 जानेवारी, 2019 च्या परिपत्रकानुसार या योजनेकरिता 100 टक्के मंजूर तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 70 टक्के मर्यादेत रु. 3807.3 हजार यापूर्वीच वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित 30 टक्के रु. 1631.7 हजार निधी वितरणास व खर्चास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने सवलती जाहीर केल्या. परंतु, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्र्न गंभीर बनला असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारच्या आदेशानुसार परीक्षांचे शुल्क माफ करण्यात आले.शिष्यवृत्ती मिळत असणार्‍या आणि खुल्या प्रवर्गातील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर सरकारने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला होता. मात्र, तो औटघटकेचा ठरला आहे. कारण भरलेली परीक्षा फी परत कशी मिळणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पुन्हा ऑनलाईन ऑफलाईन च्या घोळात पालकांप्रमाणे मुलांना सुध्दा वार्‍या करायला लावणार का असा संतप्त सवाल दुष्काळग्रस्त बळीराजा करू लागला आहे.कारण झेरॉक्स आणि ऑनलाईन ला बळीराजा वैतागला असून यातून काहीही साध्य होत नाही मिळतो तो मानसिक त्रास. आजपर्यंत आलेले अनुभव खूप भयंकर आहेत असे बळीराजा पोटतिडकीने सांगत आहे.