Breaking News

ताईंसाठी दादांकडून पाटलांची मनधरणी; अजित पवार यांनी विधानसभेसाठी मदत करण्याचे हर्षवर्धनांना दिले आश्‍वासन


पुणे / प्रतिनिधीः
लोकसभा निवडणुकीचे मतदान जसे जवळ येत आहे तसे प्रचार आणि राजकीय समीकरणांची फेरजुळवणी होत आहे. बारामती मतदारसंघात कुठलीही कसर राहू नये, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू, असे आश्‍वासन पवार यांंनी पाटील यांना दिले आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचे राजकीय हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही, तरी बेहत्तर; पण इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असे म्हणणारे पवार पाटील यांच्या दारात गेले. निवडणुकीदरम्यानची दादांची ही डरकाळी इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. लोकसभेला राष्ट्रवादीचे काम करायचे आणि विधानसभेला मात्र काँग्रेसला मदत करायची नाही असे चालणार नाही, असे काँग्रेसने सांगितले होते. आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. त्याचे कारण म्हणजे विधानसभेत राष्ट्रवादीने मदत केली नसल्याने पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रवादी जोपर्यंत विधानसभेसाठी शब्द देत नाही, तोपर्यंत लोकसभेचे काम करायचे नाही. प्रचारात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांची चिंता वाढली होती. इंदापूर, भोर आणि पुरंदर या भागात काँग्रेसची मते निर्णायक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात हा भाग येत असल्याने या भागातून मतदान झाले नाही, तर मताधिक्य घटण्याचा धोका सुळे यांना वाटत आहे. त्यामुळे दादांनी ताईंसाठी धावपळ करत पाटील यांची भेट घेतली. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही उपस्थित होते. बारामतीत या वेळी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. या वेळी कमळ चिन्ह मिळाल्याने त्याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या निवडणुकीत ही जागा रासपने लढवली होती. त्या वेळी सुळे यांना कायम मिळत असलेल्या विक्रमी मताधिक्यामध्ये लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे अजितदादांनी आता मनोमिलनासाठी प्रयत्न केले आहेत.

भारणे यांचा राजकीय बळी?

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भारणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. इंदापूर बाजार समिती, इंदापूर नगरपालिका व अन्य संस्थांतही राष्ट्रवादीची कामगिरी चांगली होती; परंतु आता सुळे यांच्या खासदारकीसाठी इंदापूरची जागा काँग्रेसला सोडून ती निवडून आणावी लागली, तर भारणे यांना थांबावे लागेल.