Breaking News

मोदींच्या पहिल्याच सभेत खुर्च्या रिकाम्यामीरतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग आज मीरत येथे घेतलेल्या सभेमधून फुंकले. पुढील 44 दिवसांमध्ये मोदी देशभरामध्ये शंभराहून अधिक सभा घेणार असल्याचे समजते. मीरत येथे त्यांनी घेतलेल्या पहिल्याच सभेमध्ये काँग्रेसबरोबरच सर्वच विरोधीपक्षांचा मोदी यांनी समाचार घेतला; मात्र या सभेला म्हणावी तितकी गर्दी झाली नाही. पहिल्या रांगेत भाजप समर्थकांची गर्दी दिसत असली, तरी मागच्या अनेक रांगामध्ये रिकाम्या खुर्च्याच होत्या. आता याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी रिट्वीट केले आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मोदी यांनी आज पहिली सभा घेतली. मोदी यांच्या या सभेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली खरी; मात्र ही गर्दी केवळ पहिल्या काही रांगेपुरती होती; मात्र मागे खुर्च्या रिकाम्याच असल्याचे ट्विट माया मीरचंदानी यांनी केले. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘पहिल्या रांगेत समर्थकांची गर्दी तर मागे रिकाम्या खुर्चा, पहिल्या सभेसाठी मोदी मीरतमध्ये दाखल झाले, तेव्हाचे चित्र.’ हे ट्विट आता व्हायरल होत असून काँग्रसचे नेते संजय झा यांनी हे रिट्वीट करत केवळ ‘आऊच’ इतकीच कॅप्शन या ट्विटला दिली आहे.
दरम्यान, मीरत येथे झालेल्या सभेमध्ये मोदी यांनी भाजप सरकारने मागील पाच वर्षांमध्ये कोणकोणती कामे केली, याबद्दलची माहिती दिली. तसेच एअर स्ट्राइकचे पुरावे मागणार्‍यांवरही त्यांनी टीका केली. माझ्याकडे गमवण्यासारखे काहीच नसल्याचेही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. सप-बसप-राजद यांनी मागील अनेक वर्षांपासून समान्य जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये केला.