Breaking News

डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे आचरण केल्यास नवक्रांती - तनपुरे


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार हे समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारे आहेत. त्यांचे विचार अगाध आहेत. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे आचरण केल्यास निश्चित नवक्रांती घडेल असे प्रतिपादन माजी खासदारप्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले.

राहुरी तालुक्यातील निभेंरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा स्थलांतर सोहळा मंगळवार(दि.२६) रोजी पार पडला. या प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, म्हाडा नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, सभापती मनिषा ओहळ, नंदा गाडे, आरपीआय नेते श्रावण वाघमारे, प्रेरणा मल्टिस्टेट अध्यक्ष सुरेश वाबळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड ,शेतकरी नेते रवी मोरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण समाजासाठी होते. त्यांचे विचार सर्वांना दिशा व प्रेरणा देणारे होते.

म्हाडा नाशिक विभाग अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले की, देशातल्या सर्व स्तरातील लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य स्वीकारावे लागले आहे. डॉ.आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ बहुजन समाजाच्या नव्हेसर्व जाती धर्मातील समाजाच्या उद्धारासाठी केला आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत विधाते, आण्णासाहेब पाळंदे, बाळासाहेब चोखर, युनूस तांबोळी, बंडू विधाते, शरद विधाते, अनिल विधाते, सुधाकर विधाते, सुधाकर संसारे आदींनी प्रयत्न केले.