Breaking News

शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांनी राज ठाकरेंना डिवचलं!


मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे. कुसुमाग्रजांच्या ‘फक्त लढ म्हणा’ या कवितेत शब्द बदलून, आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा दोन्ही नेत्यांवर आशिष शेलारांनी ट्वीटरवरुन टीका केली आहे.

“सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!!”, असे म्हणत आशिष शेलार पुढे म्हणाले, “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”

आशिष शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ट्विटरवरुनच उत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जायना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले” असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सोशल मीडियावर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि मनसे असा सामना आता येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे. आशिष शेलारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच डिवचल्याने, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.