Breaking News

पाकचा धुडकावला दबाव पायलटच्या सुटेकसाठी ; प्रयत्न करतानाही तडजोडीस नकार
नवी दिल्ली: भारताचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अभिनंदनच्या सुटकेसाठी भारतासोबत तडजोड करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे; मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न आणि दबाव धुडकावून लावले आहेत. 

अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करा असे भारताने पाकिस्तानला बजावले आहे.
जीनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणे पाकिस्तानला भाग आहे; पण त्या बदल्यात पाकिस्तानने काही अटी घातल्या आहेत. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटते आहे. त्यामुळे पाकिस्तान काही अटी घालण्याचा प्रयत्न करते आहे. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहीत आहे. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताला मान्य नाही. कंदहार विमान अपहरणाच्या वेळी ‘जैश-ए-मोहमंद’च्या अतिरेक्यांनी जसा भारतावर दबाव आणला होता, तसा पाकिस्तानचा प्रयत्न आहे; मात्र भारताने पाकिस्तानचा डाव उलटविण्याची पूर्ण तयारी केली आहे.

भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वधर्र्मान हे भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. ‘भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलाने तडजोड करायला तयार आहे,’ असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.
‘भारतीय वैमानिक आमच्याकडे सुरक्षित आहे. पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकेतांचा आदर करतो, असे शाह मेहमूद यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. परिस्थितीतून तोडगा निघावा, अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळले, की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,’ असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे. हा तणाव कमी व्हावा, यासाठी पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमधला तणाव लवकरच कमी होईल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेकडे बर्‍यापैकी चांगली बातमी आहे. दोघांमध्ये सध्या तणाव आहे आणि आम्ही मध्यस्थी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तणाव लवकरच निवळेल अशी मला आशा आहे. हा तणाव दशकानुदशकं सुरू आहे. दुर्दैवानं दोघांना एकमेकांविषयी प्रचंड तिरस्कार आहे, म्हणून आम्ही दोघांना मदत करण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करतोय.
भारत- पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पियोशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी पॉम्पियोशी मध्यरात्री फोनवर चर्चा केली. यानंतर डोवाल म्हणाले, की भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हल्ला योग्य असल्याचे अमेरिकेचे मत आहे.