Breaking News

मतदार जागृतीचा आता अधिकारी व कर्मचारी सुध्दा देणार संदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बॅजेसचे विमोचन


बुलडाणा,(प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणूकीत बुलडाणा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्याच्य दृष्टीने जिल्हा प्रशासनाने व्यापकस्तरावर मतदार जाणीव जागृती मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी सुध्दा सरसावले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्राणांमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांसाठी मतदार जाणीव जागृतीचा संदेश देणारे बॅजेस तयार करण्यात आले असून त्यांचे विमोचन आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले.

तुमचे मत तुमचा अधिकार असा संदेश देणार्‍या या बॅजेसचे विमोचन आज जिल्हाधिकारी डॉ.निरूपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शन्मुगराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. मतदार राजा जागा हो , हे आवाहन करतांनाच मतदान केंद्रांपर्यंत बहूसंख्येने मतदारांचे पाऊल वळविण्यासाठी  जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व इतर सर्व शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना हे बॅजेस वितरीत करण्यात आले आहेत. या सर्वांनी कर्तव्य बजावित असतांनाच या बॅजेसचा वापर करून मतदारांना जागृतीचा संदेश देणे अभिप्रेत आहे. दिव्यांग, महिला, वृध्द अशा सर्व गटातील मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त व प्रोत्साहन देण्याची भूमिका शासकीय अधिकारी व कर्मचा-यांकडून पार पाडल्या जाणार आहे.         

 चूनाव पाठशाळा अंतर्गत यापूर्वीच बुलडाणा जिल्हा प्रशासनाने संकल्प पत्र,  भित्ती पत्रके, फलक, घोषवाक्य, निबंध , चित्रकला इत्यादी विविध स्पर्धा शाळांमधून आयोजित केल्या होता. दिनांक 18 एप्रिल रोजी होणार्‍या मतदानासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणावर लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता अधिकारी व कर्मचारी सुध्दा सक्रीय भूमिका पार पाडणार आहेत. दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बॅजेसचा नियमित व  दैनंदिन वापर करून मतदारांना जाणीव जागृतीचा संदेश देऊन राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शन्मुगराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांनी संयुक्तरित्या केले आहे.