Breaking News

कुकडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी; सभापती गायकवाड यांचे माजी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन


पारनेर/प्रतिनिधी
कुकडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासंदर्भातचे निवेदन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या कुकडी डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी डावा कालवा वगळता या प्रकल्पातील सर्व कालवी व नदीला पाच मार्च पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जनतेसाठी अन्यायकारक आहे. या क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या चार्‍याची व फळबागांची अवस्था बिकट आहे.

या परिसरातून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आवर्तन न आल्याने हे उद्भव कोरडे पडले आहेत. जनावरांसाठी केलेला चारा पिके फळबागा पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे पशुधन वाचविण्याचा मोठा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. म्हणून 10 एप्रिल नंतर पाणी सोडण्याच्या निर्णयांनी पाण्यावर अवलंबून असणारी जनता हवालदिल झाली आहे. डाव्या कालव्यात पाणी सोडता येईल एवढे जवळजवळ 9689 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.

यामध्ये डिंबे धरणात 4422 दशलक्ष घनफूट माणिकडोह धरणात 10204 येळगाव धरणात 934 धरणात 265 पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिंपळगाव जोगा कालव्यातून पाणी सोडल्यानंतर डाव्या कालव्यासाठी तीन टीएमसी पाणी सोडले जाऊ शकते. उपलब्ध पाण्याची परिस्थिती पाहता 1000 क्युसेकने डाव्या कालव्याचे आवर्तन 15 मार्च पूर्वी सुरू केले जाऊ शकते. व नंतर पिंपळगाव जोगाचे पाणी येडगावमध्ये घेऊन आवर्तन सलग करता येईल. त्यामुळे कुकडी कालव्यातून पाणी सोडल्यानंतर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न जनावरांच्या चार्याचा प्रश्‍न व अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या या कालव्याला पाणी 15 मार्च पूर्वी सोडण्यात यावे. अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.