Breaking News

ग्रंथालय कर्मचार्‍यांचे जलसमाधी आंदोलन


कराड, (प्रतिनिधी) :  सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात तिप्पट वाढ व्हावी या मागणीसाठी ग्रंथालय कर्मचार्‍यांनी आज आठव्या दिवशी कोयना- कृष्णा नदीच्या प्रितिसंगमावर जलसमाधी घेण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्याशिवाय नदीपात्रातून ग्रंथालय कर्मचारी बाहेर येणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र कराडच्या प्रशासनाने विनंती केल्याने चार तासानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.   

सोमवारी (दि. 25) ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी मंत्रालय सचिवांशी चर्चाही केली होती , त्यावेळी त्यांनी मंत्रालयात मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र कोणतीही बैठक आयोजित न केल्याने सार्वजनिक ग्रंथालय कृती समितीच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी कृष्णा नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी 3 वाजता कर्मचारी नदीपात्रात उतरले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समधीस्थळानजीक सुरू असलेले सार्वजनिक ग्रंथालय कर्मचार्यांचे उपोषण सलग आठव्या दिवशीही सुरू होते. 

आज जलसमाधी घेणार असल्याने सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी उपोषणकर्ते रवींद्र कामत यांना प्रशासनाने उपोषण स्थळावरच बसवून ठेवले होते. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी विनंती केल्याने सायंकाळी सात वाजता जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.