Breaking News

महाराष्ट्र बँकेचे सर्व्हर पाच दिवसांपासून बंद ; ग्राहकात संताप


जामखेड/प्रतिनिधी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गेल्या पाच दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याच्या कारणावरून बँकेतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दि.20 पासून सर्व्हर बंद पडल्याने बँक अधिकारी व कर्मचारीही त्रस्त झाल्याचे दिसून आले. ग्राहकांना उत्तरे देऊन बँक अधिकार्‍यांची चांगलीच दमछाक झाली. त्यातही गेल्या 3 महिन्यापासून शाखाधिकारी नसल्याने खातेदाराचे कर्ज प्रकरण बंद आहे. 

शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी बँकांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असते. सोमवारी सर्वच कार्यालय उघडल्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी केलेली होती. ग्राहकांनी सर्व काऊंटरवर रांगा लावलेल्या होत्या. चलन भरणे, धनादेश पाठविणे, धनाकर्ष पाठविणे, काढणे, मनी ट्रान्सफर आदी कामे थांबल्याचे दिसून आले. सर्व्हर डाऊनमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. नेहमीच्या कटकटीस बँक अधिकारी देखील वैतागले आहेत. बँक अधिकारी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बँकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना बँकांची मार्च अखेरची कामे करण्यासाठी एक आठवडा शिल्लक आहे. त्यात मध्ये तीन सुट्या आल्याने व्यवहार कसा करायचा याची अडचण कार्यालयांना आहे. बँकेचे स्थानिक अधिकार्‍यांनी वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी कळवून सुद्धा काही सुधारणा व कारवाई होत नाही. मात्र, सर्व्हर डाऊन होण्याचा आर्थिक फटका बँके सह ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील बँक असल्याने वरिष्ठ अधिकारी वेळेत लक्ष देत नाही. त्यामुळे ग्राहक खाजगी बँक सारखा नवीन पर्याय शोधू लागला आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी, पुढील आठवड्यात गुढीपाडवा, शुक्रवारी मार्चएण्ड येणार आहे. त्यात सर्व्हर डाऊन होणार नाही याची शाश्‍वती कोण घेणार, वर्ष अखेरची कामे कशी होणार याची काळची ग्राहकांनी करणे साहजिक आहे. बँकांमधील सर्व्हरची दुरूस्तीची मागणी होत आहे. 

शेतीकरिता लागणारे पीक कर्ज, मजुरांना देण्याकरिता लागणारे ठेवलेले बँकेतील पैसे इत्यादी अगाऊ त्रास शेतकर्‍यांना, नागरिकांना उचलावा लागत आहे. अशात बँकेत बँक मॅनेजर नसल्यामुळे बँकेतील काम संथगतीने होतांना दिसून आले. बँकेत लवकरात लवकर चांगला बँक मॅनेजर देऊन जलदगतीने बँकेचे काम पूर्ण करावे अशी मागणी समस्त शेतकरी व नागरिक करीत आहे.