Breaking News

प्रज्वलच्या मृत्यूस कारण ठरलेलं अद्याप मोकाटच


सातारा / शंकर कदम : पाचवी इयत्तेत शिकणार्‍या अलगुडेवाडी, ता. फलटण येथील प्रज्वल गायकवाड या केवळ अकरा वर्षाच्या मुलाला काही बेजबाबदार व्यक्तींमुळे प्राण गमवावे लागले. पूर्व परवागनी न घेता शाळेने नियोजित नसलेल्या तसेच अपघातप्रवण क्षेत्र घोषित केलेल्या ठिकाणी खासगी बसमधून विद्यार्थ्यांची सहल नेली अन्‌ तिथेच अपघात होवून प्रज्वलवर काळाने झडप घातली. प्रज्वलच्या अपघातास संबंधित शाळा, संस्था तसेच शिक्षणाधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे असताना हे सर्वजण अद्याप मोकाट फिरत आहेत. हे प्रकरण दडपले गेले असून घटनेनंतर तीन महिने उलटले असले तरी प्रज्वलच्या पालकांची न्यायासाठीची वणवण थांबली नाही. न्याय न मिळाल्यास आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रज्वलच्या आईने दिला आहे. हे प्रकरणावर नेमका कोणाचा दबाव आहे, पडद्याआड असणार्‍यांना उजेडात आणणार का, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे, अलगुडेवाडी येथील प्रज्वल गायकवाड हा विद्यार्थी प्रगत शिक्षण संस्थेच्या फलटण येथील कमला निमकर बालभवनात इयत्ता पाचवीत शिकत होता. या शाळेने 4 जानेवारी 2019 रोजी शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही सहल लिंब येथील बारा मोटेची विहीर, मेणवली येथील ऐतिहासिक वाडा, धोम धरण आदी ठिकाणी नेण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात या ठिकाणांसह पूर्व नियोजित नसलेल्या व अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या वडाचे म्हसवे येथे नेण्यात आली. हा प्रकार होत असताना त्याकडे विद्यार्थ्यांसमवेत असलेल्या शिक्षकांचे मात्र गांभीर्याने लक्ष नव्हते. यामुळे बसला वडाचे म्हसवे येथे अपघात झाला. त्यात प्रज्वलचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर संस्थेकडून प्रज्वलचे वडील नितीन गायकवाड यांना अपघाताबद्दल कळवले. एका रुग्णवाहिकेतून प्रज्वलचे वडील नितीन गायकवाड, त्यांचे बंधू तसेच शाळेचे तीन कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, दरम्यानच्या कालावधीत प्रज्वलचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. केवळ काहींच्या निष्काळजीपणामुळे प्रज्वलला प्राणास मुकावे लागल्याची चर्चा घटनेनंतर संपूर्ण फलटण तालुक्यात होवू लागली होती.

पूर्व परवानगी नसताना, एसटीऐवजी खासगी बसमधून ते सुध्दा पूर्व नियोजित नसलेल्या ठिकाणी सहल नेल्याने बसला अपघात झाल्याचे समोर आले आहे. वडाचे म्हसवे येथे अपघातप्रवण क्षेत्र असा बोर्ड लिहिलेला असतानादेखील त्याकडे कानाडोळा करीत त्या ठिकाणी बस घेवून जाणे, हे बेजबाबदारपणाचेच लक्षण आहे. प्रज्वलच्या मृत्यूस कारण संबंधित शाळेसह शिक्षक, संस्था तसेच शिक्षणाधिकारी हे सर्वजण जबाबदार आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे असताना घटनेनंतर तीन महिने उलटले असले तरी अद्याप कसलीही कारवाई झाली नाही. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना विचारले असता, संबंधित शाळा ही जिल्हा परिषद शाळा नसल्याने कारवाईसंदर्भात आमच्यावर मर्यादा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पिडित कुटुंबाला भेट देणे किंवा कारवाईसंदर्भात त्यांना कुठले आश्वासन देणे हे संस्थेचे व संबंधित शाळाचालकांचे कर्तव्य आहे. त्यात आमचा विशेष रोल येत नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

प्रकरण कुणी दडपलं! 

प्रज्वलचे पालक गेले तीन महिने न्यायासाठी वणवण करीत आहेत. हे प्रकरण कुणीतरी दडपत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. आमची कोणतीही तक्रार नसल्याबाबतचे पत्र पोलीस आपल्याकडे असल्याचे सांगतात. वास्तविक, असे कोणतेही पत्र आम्ही दिले नाही. मग हा बनाव कुणाचा आहे, असा सवाल पालक करीत आहेत. न्याय न मिळाल्यास मी आत्मदहन करेन, असा इशारा प्रज्वलच्या आईने दिला आहे. या प्रकरणाबाबत नेमकी काय कारवाई होणार, कुणावर होणार, की होणारच नाही, असे अनेक प्रश्न फलटण तालुक्यातील जनतेमधून उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठवू, असे पालकांचे म्हणणे आहे.