Breaking News

मॉबलिचिंगच्या घटनांना आळा घालावा


अहमदनगर/प्रतिनिधी : “देशात व जगात घडणार्‍या विविध दहशतवादी व मानवी हिंसाचारी घटनांना मुसलमान व इस्लामशी जोडण्याचा प्रयत्न माध्यमांद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. नुकत्याच न्यूझीलंड येथे घडलेल्या क्राईस्ट चर्च भागातील मस्जिदीवरील हल्ल्यात शेकडो निरपराध मुस्लिमांना प्राण गमवावे लागले. तसेच गुरुग्राम येथे मुस्लिम कुटुंबाच्या घरात घुसून केलेला प्राणघातक हल्ला या घटनांचा मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलतर्फे निषेध करण्यात येऊन गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे’’, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलच्या शिष्टमंडळाने गुरुग्राम येथे घडलेल्या घटनेबाबत हरियाणा सरकाने या घटनेतील दोषी समाजकंटकांवर कठोर कारवाई करुन पीडित कुटूंबाला न्याय व संरक्षण द्यावे, ही मागणी करण्यात आली. प्रशासनाकडे केलेल्या निवेदनात प्रमुख्याने धार्मिक द्वेष पसरवून, विचारवंतांच्या, पत्रकारांच्या हत्या करण्याचा आरोप असणार्‍या संघटनांवर शासनाने कारवाई करावी. तसेच गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत मोहसीन शेख (पुणे),आखलाक (दादरी), पहेलूखान अशा निरपराध युवकांची धार्मिक द्वेषातून हत्या करण्यात आली. या मॉबलिचिंगच्या घटनांना आळा घालण्यात राज्य व केंद्र शासन अपयशी ठरले. याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी. यातील आरोपींना खटल्याचा निकाल लागेपर्यंत न्यायालयाने जामीन देऊ नये. 

यावेळी सय्यद वहाब, शफी जहागिरदार, नफीस चुडीवाल, शहेबाज बॉक्सर, राजूभाई मित्र मंडळ, कासमभाई केबलवाले, दरबार फ्रेंड सर्कल, वहदेत ए इस्लामी आदी सहभागी झाले होते.