Breaking News

आजपासून माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यास प्रशासनाची परवानगी


औंध,  (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पुर्वेकडील तालुक्यात उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाल्यामुळे वाढत्या तपमानामुळे विद्यार्थ्यांची होणारी तगमग लक्षात घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माध्यमिक शाळा एक मार्च पासून सकाळी घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

सध्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही शाळांमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने शाळा सुरळीतपणे चालविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पुर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात उन्हाची तीव्रताही वाढू लागली आहे. अवर्षणामुळे सध्या पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. काही शाळेच्या इमारती पत्र्याच्या आहेत, त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे तापमान वाढू लागल्यामुळे मुले उकाड्याने अस्वस्थ होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देऊन एक मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची विनंती केली होती. वाढत्या तपमानाचा विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन शुक्रवारपासून (दि. एक मार्च) माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची परवानगी शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेमुळे कर्मचारी पर्यवेक्षणासाठी पाठवावे लागतात. कर्मचारी संख्या कमी असल्याने शालेय कामकाज चालवणे कठीण झाले होते. यामुळे शाळा सकाळी घेण्याची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थी, कर्मचारी यांना दिलासा दिला आहे अशी माहिती सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली. त्यासाठी मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकार्‍यांची भेट देऊन तसेच पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता, त्यास हे यश आले आहे.