Breaking News

स्टाईल आयकॉन खासदार उदयनराजे विरुद्ध मुलूखमैदान तोफ प्रा. बानुगडे-पाटील

प्रा. बानुगडे-पाटील साठी इमेज परिणाम

सातारा जिल्ह्याच्या स्टार प्रचारकरांची जुगलबंदी रंगणार
सातारा / प्रतिनिधी : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याने देशाच्या राजकारणात आपला प्रभाव कायमच पाडला आहे. क्रांतीकारकांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या या भूमितून महाराष्ट्रच नव्हेतर देशातील विविध ठिकाणी जाऊन केंद्रात व राज्यात मंत्री, खासदार, आमदार, महापौर अशी महत्वाची पदे भुषविली आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीचे खासदार स्टाईल आयकॉन उदयनराजे भोसले व शिवसेनेचे उपनेते तथा शिवव्याख्याते मुलूखमैदान तोफ प्रा. नितिन बानुगडे पाटील यांना महाराष्ट्रातून प्रचार सभेसाठी निमंत्रण येवू लागले आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यातील या दोन स्टार प्रचारकांची जुगलबंदी महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे.
यातील खासदार उदयनराजे भोसले हे स्वत: राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. तर शिवसेनेचे प्रा. बानगुडे- पाटील हे सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर या चार लोकसभा मतदार संघात सेना-भाजप युतीचे समन्वयक आहेत. दोन्ही स्टार प्रचारक हे महाराष्ट्राचे लाडके आहेत. खासदार आपल्या स्टाईलमुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय आहेत तर शिवव्याख्यात्यांच्या ओजस्वी वाणीने शिवशाही आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. त्यामुळे सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. उदयनराजे यांना आपला प्रचार करून महाराष्ट्रातील किमान चाळीस लोकसभा मतदार संघात आपल्या स्टाईलने प्रचारात रंगत आणावी लागणार आहे. तीच परिस्थिती भाजप-शिवसेनेची आहे. या ठिकाणी शिवसेनेत तेवीस तर भाजप व मित्रपक्ष पंचवीस मतदार संघात निवडणूक लढवित आहेत. देश पातळीवर आपला प्रभाव असणारे बारामतीचे शरद पवार, ग्वाल्हेरचे ज्योतीरादित्य सिंधीया उर्फ शिंदे हे अनुक्रमे सातारा जिल्ह्यातील नांदवळ ता. कोरेगाव व कण्हेर खेड या गावचे मुळचे सुपूत्र आहेत.
सध्या शिवसेनेचे उपनेते प्रा. पाटील हे भाजप सेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचार नियोजनासाठी दोन दिवस सातार्‍यात थांबल्यानंतर 1 ते 27 एप्रिल पर्यंत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्र्चिम महाराष्ट्र व ठाणे मुंबईत प्रचारातून फुले-शाहू, आंबेडकरांचे विचार त्याच बरोबर राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे चरित्र व विचार मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. तर राष्ट्रवादीचे व सातारचे उमेदवार खा. भोसले यांची एन्ट्री व त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल आणि फिल्मी डायलॉग तसेच सेना भाजपच्या कार्यपद्धतीवर शाब्दीक आसूड ओढण्याची त्यांची लकब आपल्या मतदार संघातील मतदारांनी पाहून आपल्याला मतदान करावे, अशी आघाडीच्या उमेदवाराची अपेक्षा आहे. त्यासाठी दोन्ही स्टार प्रचारकांना चार्टड विमान, हेलिकॉप्टर पासून ते अलिशान वाहनांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहेत. या दोन स्टार प्रचारकांमुळे सातारचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा गाजणार आहे. पन्नास वर्षापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. किसन वीर, स्व. बाळासाहेब देसाई यांनी राज्यात आपला नावलौकिक पोहोचवला होता. सध्याच्या पिढीत हे दोन स्टार प्रचारक सातार्‍याची क्रेझ वाढवत आहेत.