Breaking News

महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात


सातारा / प्रतिनिधी : सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना कोणतेही कारण न सांगता काहीही करुन निवडून आणण्याचा वज्रनिर्धार बुधवार येथील प्रीती एक्झीक्युटीव्ह हॉटेलच्या नरिमन हॉलमध्ये झालेल्या महायुतीच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. मात्र, या बैठकीला रिपाइं, रासप रयत क्रांती संघटना शिवसंग्राम आणि मित्रपक्षाच्या एकाही पदाधिकार्‍याने हजेरी लावल नसल्याने त्यातच रिपाइंला जागा न सोडल्याने हे मित्रपक्ष महायुतीचे काम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बैठकीला महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, शिवसेने उपनेते नितीन बानगुडे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माण खटावचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, जि. प. सदस्य दीपक पवार, एस. एस. पार्टे, महिला आघाडीच्या शारदा जाधव, संजय लेवे, धनंजय जांभळे, विजय काटवटे, रणजित भोसले, नगरसेविका सिद्धी पवार यांच्यासह तालुकाप्रमुख व बूथप्रमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा जिल्हा माथाडी कामगरांचा बालेकिल्ला आहे. आणि यावेळी सातारा जिल्ह्यात पुनश्च: 1995 सालचा इतिहास घडवायचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करुन दाखवणार आहे. कॉलर उडवणे व स्टेजवर गाणे असा कार्यक्रम सुरु असून त्यामुळे मते मिळत नाहीत असे उदयनराजेंचे नाव न घेता टोला लगावला. मी निवडून येणारच असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, मतभेद, मनभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकदिलाने मीच नरेंद्र पाटील आहे अशा भावनेने कामाला लागावे असे आवाहन करत राज्यात नरेंद्र आहेच आता जिल्ह्यातही नरेंद्र हवा यासाठी येत्या 30 तारखेला फॉर्म भरण्याच्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विरोधकांच्या मनात धडकी भरवण्याचे काम करण्यासाठी सज्ज व्हावे. शिवसेना आणि भाजपकडे भरती सुरु असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गळती सुरु असल्याचेही त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या भाजपा व शिवसेनाप्रवेशाबाबत भाष्य केले.

पुरषोत्तम जाधव म्हणाले, विद्ममान खासदारांनी गत 10 वर्षात मतदारसंघाचे वाटोळे केले आहे असा घणाघात करत त्यांनी सातारा जिल्ह्याला मान शरमेने खाली घालावयाचे काम केल्याचे उदयनराजेंचे नाव न घेता स्पष्ट केले. कॉलर उडवून व शिट्ट्या मारुन मते मागावी लागतात ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दीपक पवार, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आपली मते मांडून 1995 ची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार केला. दरम्यान, गतवर्षी रिपाइंला सातारा लोकसभेची जागा सोडण्यातआली होती. यावेळीही पदाधिकार्‍यांनी तशी मागणीही केली होती. 

मात्र या मागणीचा काहीही विचार न झाल्याने व ही जागा शिवसेनेकडे गेल्याने महायुतीच्या या बैठकीला रिपाइंसह रासप, शिवसंग्राम व मित्रपक्षांच्या पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.
युतीने गत साडेचार वर्षात आमच्या पक्षाची केलेली कुचेष्टा आणि प्रतारणा याचा विचार करता यावेळी आम्हाला सन्मानाने बोलावले तरच आम्ही युतीसोबत जाणार असे स्पष्ट मत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले. सातार्‍यात झालेल्या पत्रकार परिषद आणि बैठकीला आम्हाला केवळ फोनवरुन येण्याचे आमंत्रण देण्यात आले. वास्तविक याआधी मित्रपक्षांच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी एक बैठक आयोजित करावयास हवी होती. त्यांची आणि आमची 2014 मधील निवडणुकीसारखीच हवी असेल तर त्यांनी आधी मैत्रीची व्याख्या स्पष्ट करावी अशी उपरोधीक सूचनाही त्यांनी केली.