Breaking News

दिवसा ओसाड ....रात्री अवैध धंदे, मद्यपानाचे ठिकाण..!


सातारा,  (प्रतिनिधी) : सातार्‍यातील पहिली माध्यमिक शिक्षणशाळा म्हणून सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल ओळखली जाते. अवाढव्य जागा, मोकळा परिसर, क्रीडांगणापासून ते सर्व प्रकारच्या सुविधा असूनही निव्वळ प्रशासकीय दुर्लक्ष आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या या वास्तुकडे जबाबदार घटकांचे आज पूर्णपणे दुर्लक्ष केले होत आहे. त्यामुळेच या शाळेच्या वसतीगृहाच्या परिसराला आज दिवसा ओसाड आणि रात्री अवैध धंदे आणि मद्यपानासाठीची मोफत जागा..एवढेच त्याचे स्थान उरले आहे.

सातारचे प्रतापसिंह हायस्कूल ही सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा म्हणून ओळखली जाते. किंबहुना शहराचा आणि सातारा जिल्ह्याचा शैक्षणिक प्रवास या शाळेतूनच सुरु झाला, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सरन्यायाधिश गजेंद्रगडकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी या शाळेचे नाव आपल्या कर्तृत्वाने दुमदुमून टाकले. 

शाळेचा इतिहासच सांगायचा झाला तर सातारा नगरपालिकेच्या स्थापनेनंतर म्हणजे 1 ऑगस्ट 1853 नंतर नगरपालिकेचे 1884 साली सीटी म्युनिसिपालिटीमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी मुलांच्या मराठी शाळा 8, हिंदुस्थानी मिश्र शाळा 1, रात्रीची शाळा 1 व मुलींकरीता 1 अशा 11 शाळा होत्या. रात्रीची शाळा मजूर आणि कारागिर लोकांच्या मुलांकरीता होती. नगरपालिकेकडे शिक्षण येण्यापूर्वी 1866 साली सातार्यात 4 प्राथमिक शाळा होत्या. त्यामध्ये 538 विद्यार्थी होते. 1883 सालापर्यंत 10 सरकारी शाळा होत्या. त्यामध्ये 1 इंग्रजी शाळा, 7 मराठी मुलांच्या शाळा आणि एक मुलींची शाळा अशी स्थिती होती. इंग्रजी शाळा प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली. या शाळेचे मुख्याध्यापक बाळशास्त्री भागवत होते. ही शाळा पूर्वी रंगमहालात होती. 1871 मध्ये शाळेचे हायस्कूलमध्ये रुपांतर झाले. 1874 साली रंगमहालाचा बराच भाग जळाल्याने ही शाळा गव्हर्नमेण्ट हायस्कूल म्हणून सध्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये अगर ज्याचे नाव जुना राजवाडा होते या ठिकाणी सुरु झाली. याच वास्तुमध्ये नगरपालिकेच्या शाळा क्र. 1 आणि शाळा क्र. 13 या शाळाही पाचवी ते सातवी आणि पहिली ते चौथी असे शिक्षण देण्यासाठी उपलब्ध होत्या आणि हे शिक्षण पूर्णपणे विनामुल्य होते. त्यानंतर सातार्‍यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या नव्या नव्या शाळा उभ्या राहिल्या. तरीही स्वातंत्र्योत्तर काळात ज्याचे नाव गव्हर्नमेण्ट हायस्कूलऐवजी प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले त्या शाळेचा नावलौकिक कायम होता. याचे कारण शिक्षणातून फक्त शिक्षित निर्माण न करता त्याच्यातून कुशल व्यावसायाभिमुख शिक्षण घेतलेला विद्यार्थीही तयार व्हावा, ही कल्पना या शाळेत जाणीवपूर्वक राबवली जात होती. 

सध्याच्या राधिका रस्त्यावर असलेला जिल्हा परिषदेचा शेती परिसर हा मूळात प्रतापसिंह हायस्कूलची शेती शाळा होती. ज्या शाळेत ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना शेतीविषयक शिक्षण देण्यात येत होते. याबरोबरच आज ज्याचा स्किल डेव्हलेपमेंंट म्हणून गवागवा केला जातो त्या स्किल डेव्हलपमेंटची एक तुकडी या शाळेत आठवी ते अकरावीपर्यंत अस्तित्वात होती. 

ज्या वर्गातील मुले आठवड्यातून दोन दिवस सध्याच्या एसटी बसस्थानकासमोरील धंदेशिक्षण शाळेत व्यावसायपूरक शिक्षण घेण्यासाठी दोन दिवस जात असत. ज्या तुकडीला टेक्निकलची तुकडी या नावाने ओळखले जात असे. या सरकारी शाळेकडे तत्कालिन राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आणि ही शाळा जवळपास दुर्लक्षित आणि विस्मरणाच्या स्थितीत जावून पोहोचली. जिल्हाभरातून येणार्‍या विद्यार्थ्यांची निवासाची सोय ही शाळेतच व्हावी यासाठी या शाळेने त्याकाळात एका मोठ्या विद्यार्थी वसतीगृहाचीही सोय केली होती. ज्यामध्ये प्रत्येक खोलीत साधारणत: सहा ते सात मुलांच्या निवासाची सोय करण्यात आली होती. अशा एकूण 24 खोल्या या शाळेच्या वसतीगृहासाठी अतिशय दर्जेदार बांधकाम करुन उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. 

या वसतीगृहाशेजारीच या शाळेच्या मुख्याध्यापकांचा बंगलाही बांधला गेला होता. पण या सार्‍या गोष्टी शिक्षण खाते, प्रशासन आणि राजकारणी व तथाकथित शिक्षणप्रेमी यांच्या दुर्लक्षामुळे आता विजनवासात गेले आहे. जागा उपलब्ध असूनही आज या वसतीगृहात एकही विद्यार्थी राहत नाही. त्याचबरोबर मुख्याध्यापकांचा बंगलाही आज ओसाड स्थितीत जमा आहे. आजही ग्रामीण भागातून सातारा शहरात शिक्षणासाठी येणारी आणि न परवडणारी भाडे देवून कॉटबेसीसवर शहरात राहणार्‍या विद्यार्थ्यांची कमतरता नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी या वसतीगृहाची दुरुस्ती करुन त्याचा वापर आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल पण गुणवान विद्यार्थ्यांच्या निवासासाठी करुन दिला तर अशा आर्थिक संकटाने गांजलेल्या शिक्षणप्रेमी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. एकतर रहदारीच्या सर्व सोयी हाकेच्या अंतरावर उपलब्ध असल्यामुळे या विद्यार्थ्यांची मोठी सोय होवू शकेल. याशिवाय फक्त विद्यार्थिनींसाठी वसतीगृह म्हणून ही वास्तू उपयोगात आणली तर तोही एक चांगला मार्ग ठरु शकेल. पण हे शहाणपण कुणाला सुचत नाही हे वास्तव आहे. 

तूर्तास तरी अंधार पडल्यावर या जागेतील मोकळ्या जागेचा वापर हा मद्यप्रेमींच्या मद्यपानासाठी केला जात आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी आणि राजकारण्यांनी या जागेचा वापर मद्यालय अगर छुपी वेश्यालये यासाठी होण्यापासून सर्व प्रयत्न करुन रोखण्याची गरज आहे. 

त्याचबरोबर थोडाफार आर्थिक भार सोसूनही या इमारतीची डागडुजी आणि काहीसे नुतनीकरण केले आणि त्याचबरोबर प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना या निवासी मुख्याध्यापक निवासातच राहणे बंधनकारक केले तर या वास्तूचा खर्‍या अर्थाने गोरगरीबांच्या मुलांना त्यांचे शिक्षण सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी निश्र्चितपणे होवू शकेल एवढे शहाणपण सरकारला सुचावे एवढीच अपेक्षा आपण आज करु शकतो.