Breaking News

युद्ध परिस्थिती निर्मितीचा पाकचा प्रयत्न; भारताचा आरोप


नवीदिल्लीः भारत आणि पाकिस्तामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटे बोलले असल्याचा आरोप भारताकडून कऱण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ‘जैश-ए-मोहमंद’संबंधी खोटी माहिती दिली. याशिवाय भारताचे दोन वैमानिक आपल्या ताब्यात असल्याची खोटी माहिती दिली असल्याचे भारताने निदर्शनास आणले.

भारताने आपण कर्तारपूरवर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते; मात्र पाकिस्तानने विमानांच्या धावपट्ट्या आणि समझौता एक्स्प्रेस बंद केली. आम्ही प्रयत्न करत असताना पाकिस्तान मात्र युद्ध परिस्थिती निर्माण करत आहे, असे भारताने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सुखरुप सोडवण्यासाठी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या पायलटला भारतामध्ये पाठवावे, अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे. वर्थमान यांना पाकिस्तानने तातडीने भारतामध्ये पाठवावे. अभिनंदन प्रकरणावरुन कोणतीही देवाणघेवाण केली जाणार नाही. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होईल आणि चर्चेचा पत्ता आपल्या हातात आहे असे पाकिस्तानला वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक दिली जावी, अशी भारताची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.