Breaking News

डॉ. अतुल भोसले वाढदिवस साजरा करणार नाहीत


कराड/ प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्‌याच्या पार्श्र्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसांचे शुभेच्छाफलक लावू नयेत. तसेच वाढदिवसानिमित्त हार-पुष्पगुच्छ अशाप्रकारच्या भेटवस्तू देऊ नयेत, असे आवाहन अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्‌यात 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. 

आज देश एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपला असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत त्यांना धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच देशाच्या सीमेवर दिवसरात्र तैनात असणार्या जवानांना पाठिंबा देण्याची गरज आहे. याच भावनेतून ना. डॉ. अतुल भोसले यांनी यंदा गुरूवार दि. 28 मार्च रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, कार्यकर्त्यांनी वाढदिवसांचे शुभेच्छाफलक लावू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यास डॉ. अतुल भोसले हे कराडमध्ये उपलब्ध नसतील, असेही कळविण्यात आले आहे.