Breaking News

जैन धर्मगुरूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कर्जत बंद; सर्व समाज बांधवांकडून निषेध मोर्चा, पोलिस प्रशासनाला निवेदन

कर्जत/प्रतिनिधी
जगाला अहिंसेची शिकवण देणार्‍या जैन समाजाच्या धर्मगुरूंवर विकृत विचाराच्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याचा कर्जत येथे तीव्र निषेध करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यत कर्जत शहर बंद ठेऊन निषेध नोंदवण्यात आला. जैन समाजासह इतर सर्वच समाजाच्या लोकांनी निषेध मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले.

जैन मुनी सिद्धसेन विजय महाराज व श्री भव्यघोष विजय महाराज या जैन धर्मगुरूंना शिरूर तालुक्यातील कवठे यमाई या रस्त्याने पायी जात असताना मुबाळवाडी, तालुका शिरूर येथील व्यक्तीने दारूच्या नशेमध्ये रस्त्यावर दुचाकी आडवी लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे कर्जत तालुक्यामध्ये तीव्र पडसाद उमटले. आज सकाळपासून शहरातील सर्व व्यावसायिकानी बंद पूकारून या घटनेचा निषेध केला. सकाळी साडेनऊ वाजता येथील जैन बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. जैन धर्म स्थानकापासून जैन मंदिरामध्ये वंदन करून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर येथे चौक सभा झाली. प्रसाद शहा, सुरेश खिस्ती, अ‍ॅड. धनराज राणे, नवनाथ शिंदे, डॉ. प्रकाश भंडारी, सविता नितीन बोरा, रवींद्र कोठारी, गणेश जेवरे, अ‍ॅड. धनराज राणे यांची भाषणे झाली. आशिष बोरा यांनी आभार मानले. यानंतर कर्जत पोलिस स्टेशनमध्येही छोटी सभा पार पडली. यावेळी अ‍ॅड. बापूसाहेब चव्हाण, चंदनबाला महावीर बोरा, अ‍ॅड. अशोक कोठारी, सतीश पाटील, अशोक खेडकर, यांनी आपली मनोगते व्यक्त करून या घटनेचा तीव्र निषेध केला. प्रसाद शहा यांनी सूत्रसंचलन केले. स्वप्नील देसाई यांनी आभार मानले.

जैन समाजाने गुरु महाराजांच्या वीहाराचे योग्य नियोजन करावे व शासनाने साधू साध्वीना विहारात पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी अनेकांनी यावेळी व्यक्त केली. तर आरोपीची नार्को टेस्ट करून हल्ल्यामागे इतर कोणी आहे कां? हल्ल्याचा उद्देश काय हे शोधून काढावे व गुन्हेगाराला अल्पसंख्याक कायद्यानुसार कडक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभय बोरा, कर्जतचे अध्यक्ष विजय खाटेर, राकेश देसाई, वैभव शहा, नीलेश बोरा, पोपटभई देसाई, गौतमचंद बोथरा, पोपटलाल बोरा, डॉ. उदय बलडोटा, कांतिलाल छाजेड, किरण बोथरा, संतोष भंडारी, सचिन बोरा, प्रताप शहा, अ‍ॅड. विक्रम देसाई, चेतन शहा, राजेश शहा, मनीषा कोठारी, ज्योती शहा, सविता छाजेड, अनिकेत खाटेर, आदीसह मोठ्या संख्येत जैन संघटनेचे विविध पदाधिकारी यांच्यासह उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, साजिद पिंजारी, दिपक भोसले, अर्जुन भोज, बिभीषण खोसे, पंढरी काकडे, पिण्टु धाण्डे, शंकर भैलूमे, आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांनी निवेदन स्वीकारले.