Breaking News

मिशनशक्तीने भारत अंतराळात महाशक्ती

Image result for मिशनशक्ती

शास्त्रज्ञांचे विरोधकांकडून अभिनंदन; पंतप्रधान मोदी यांच्यावर मात्र टीका

नवी दिल्लीःभारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राने दुसर्‍या एका उपग्रहाला पाडले. असे सामर्थ्य असणार्‍या मोजक्या देशांच्या रांगेत भारत जाऊन बसला. अशी कामगिरी करणार्‍या वैज्ञानिकांचे सर्वंच पक्षांनी स्वागत केले असले, तरी जवानांपाठोपाठ वैज्ञानिकांच्या कामगिरीचे श्रेय घेऊन त्याचे निवडणुकीत भांडवल करण्याच्या मोदी यांच्या कृतीवर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे.

27 मार्च चा दिवस देशासाठी अभिमानाचा ठरला आहे. मोदी यांनी भारत अंतराळात महाशक्ती ठरल्याचे सांगितले. ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये एका लाइव्ह सॅटेलाईटला भारताच्या अँटी सॅटेलाइटने पाडले. भारताने केलेली ही कामगिरी मिशन शक्तीच्या अंतर्गत होती. भारताने आपली ताकद दाखवण्यासाठी हे पाऊल उचलले. त्यामुळे भारताचे लष्कर आणखी मजबूत झाले. अंतरिक्षात 300 किलोमीटर अतंरवरील सॅटेलाइट भारताने उद्ध्वस्त केला. भारताने स्वत:चाच सॅटेलाइट नष्ट केला. त्यातून भारताने अंतराळातील आपली पोहोच जगातील देशांना दाखवली आहे. अंतराळातील उपग्रह पाडण्यासाठी खूप शक्ती लागते. उपग्रह पाडण्याचे किंवा अशा प्रकारची चाचणी ही युद्धाच्या वेळी वापरली जाते. शत्रू राष्ट्रावर धाक बसवण्यासाठी भारताने मिशन शक्ती केले. ही चाचणी करत असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियम किंवा संधीचे भारताने उल्लंघन केलेले नाही.
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ’मिशन शक्ती’ यशस्वी झाल्यानंतर शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले; मात्र त्यांनी मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खोचकपणे शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान ड्रामेबाजी करतात, असा संदेश राहुल यांना या ट्विटमधून द्यायचा होता, असे मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केले आहे. राहुल यांच्या या ट्विटची ‘सोशल मीडिया’वरही चांगलीच चर्चा होत आहे. काँग्रेस समर्थकांनी यावरून पंतप्रधानांना टार्गेट केले आहे. भाजपने मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसला धारेवर धरले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मिशन शक्ती’वरून मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला, याबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन करून मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? असा प्रश्‍न राज यांनी उपस्थित केला आहे. ‘वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे, त्यांना सांगू द्या... त्यांना प्रसिद्धी मिळू द्या’, असा टोलादेखील राज यांनी लगावला आहे.
केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून भारताने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगभरातून यासाठी भारताचे कौतूक होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजची उपलब्धी मोठी आहे, त्याबद्दल अंतरिक्ष वैज्ञानिकांचे अभिनंदन केले पाहिजे, असे ते म्हणाले. आमच्या सरकारच्या काळात संरक्षण खात्याचे राष्ट्रीय सल्लागार व्ही. के. सारस्वत होते, त्यांनी 2012 साली भारताने अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती, याची आठवणही चव्हाण यांनी करून दिली. त्यामुळे आपल्याकडे हे तंत्रज्ञान आधीच होते, फक्त त्याची चाचणी केली नव्हती असेही ते म्हणाले.
एकीकडे मिशन शक्तीचे कौतुक होत आहे; मात्र पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ट्विट केले आहे. ममता म्हणाल्या, की मिशन संदर्भातील माहिती तातडीने जाहीर करण्याची गरज नव्हती. तरीसुद्धा मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना ही माहिती जाहीर केली. याचा अर्थ भाजपला ऑक्सिजनची गरज आहे. भाजपची बोट बुडत आहे, तिला सावरण्यासाठीच पंतप्रधानांनी मिशन शक्तीचा वापर केला आहे, असे टीकास्त्र सोडत ममता यांनी निवडणूक आयोगाकडे मोदी आणि त्यांच्या पक्षाने आचासंहितेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची तक्रार दाखल करणार असल्याचे ट्विट करत सांगितले आहे.