Breaking News

शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे तर मुले व्हॉट्सऍप व फेसबुकमध्ये डोके घालून...


राजेंद्र लोंढे /पाटण : जून महिना तोंडावर आला तरी वळीव पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्यात नांगरट केलेली शेतातील ढेकळे न फुटल्यामुळे शेतीची मशागत कशी करायची या विवेचनेत ग्रामीण भागातील शेतकरी राजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तर त्यांची मुले व्हॉट्सऍप व फेसबुकमध्ये डोके घालून बसले असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

चालु वर्षी मल्हारपेठ परिसरात वळीव पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रत्येक वर्षी मे महिन्यात एक ते दोन जोरदार वळीव पाऊस पडतात. मात्र चालु वर्षी अजिबात वळीव पाऊस झाला नाही. वाड्यावस्तीवरील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील काढणी -मोडणी झाल्यानंतर आपली शेते खरीब हंगामातील पिक जोमाने यावे म्हणून नांगरट करून ठेवली आहेत. मात्र चालु वर्षी दोन -चार वेळा आभाळ आले, वळीव पावसाचे वातावरण तयार झाले. मात्र वळीव पाऊस पडला नाही. वळीव पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दोन महिन्यापूर्वी शेतांची नांगरट केली आहे. उन्हाळ्याची तीव्रताही चालु वर्षी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र शेतातील नांगरट केलेली ढकले बारीक होण्यासाठी जोरदार वळीव पावसाची गरज असते तो न झाल्यामुळे शेतकर्‍यांच्यापुढे पुर्व हंगामातील मशागतीचा प्रश्र्न उभा राहिला आहे. एक दोन शेतकर्‍यांनी बैलाने कुळवणी केली तर ट्रॅक्टरने नांगरट केल्यामुळे मोठमोठी पडलेली ढेकळे फुटणार नाहीत. तर ट्रॅक्टरने फणनी केल्यास मनासारखे पाहिजे अशा प्रकारचे मशागत काम होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
तर दुसरीकडे सोशल मिडियाने शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुण वर्गाला झपाटले असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ पासून प्रत्येक जण मोबाईलमध्ये डोके खुपसून बसल्याचे दिसत आहे. त्यात ग्रामीण भागातील तरुण वर्गही मागे नाही. आज ग्रामीण भागात व्हॉट्सऍप व फेसबुकचे चांगलेच पिक आले आहे. वाड्यावस्तीवरील वयोवृद्ध ग्रामस्थ वळीव पाऊस, शेती, उत्पन्न, कोणते पिक पेरणी करायचे या चर्चेत पारावर बसले असताना पारावरील एका कोपर्‍यात त्यांचीच मुले मोबाईलमध्ये डोके खुपसून बसल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील तरुण मोबाईलसह समाजकरणाच्या नावाखाली कुण्या लुंग्या - सुंग्याच्या नादाला लागून राजकारण करत दिवस वाया लावत आहे. नुकत्याच ग्रामपंचायती निवडणुकीचा कार्यक्रम सुर असल्यामुळे दिवसभर मोबाईल, राजकारण व संध्याकाळी कोणाच्या तरी मेजवानीचा आस्वाद घेत आणि भेटल त्यास जय म्हणत आपला दिवस घालवत आहे. शेतकरी बापाचा मुलगा काही सांगावयास गेल्यास उलट - सुलट उत्तरे देत आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची मुले वयात आल्यानंतर आई-वडीलांना हातभार लावतील अशी अपेक्षा होती मात्र मुले मोबाईलमध्येच व्यस्त दिसत आहेत. शेती कामासाठी ग्रामीण भागात मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. मुले मोबाईलमुळे कोपली असून निसर्गानेही परिक्षा घेतल्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसल्याशिवाय कोणताच पर्याय ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकरी राजाकडे नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.