Breaking News

अब्दुल सत्तार यांना काँगे्रसकडून उमेदवारीची आशा; सोमवारी भूमिका जाहीर करणार


औरंगाबाद : काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर सभा घेत भव्य शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची घोषणा सत्तार यांनी केली. त्याच बरोबर काँग्रेसच्या तिकीट वाटपाच्या धोरणावर प्रश्‍नचिन्ह उभे केले असले तरी, सत्तार हे काँग्रेसच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे या सभेत पाहायला मिळाले. 

सभा संपल्यावर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून एक एप्रिलला भूमिका जाहीर करू, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्तार यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर निवडणूक लढवण्याची भूमिका मतदारांना विचारून जाहीर करू असे म्हणत सत्तार यांनी आमखास मैदानावर सभा घेतली.काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तारभूमिका घेत असताना काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सत्तार यांच्या व्यासपीठावर दिसून आले. काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना पाठिंबा दिला. काँग्रेसमध्ये नेतृत्व राहिले नसल्याचा आरोप रामकृष्ण बाबा पाटील यांनी केला. निवडणूक लढवण्याआधी एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारले होते. 

ते नाही म्हणाले होते, नंतर एमआयएमच्या प्रमुखांनी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली. मात्र, सत्तार निवडणूक लढवणार कळताच त्यांची ताकद कमी होण्याच्या भीतीने हैदराबादला जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन आले.मी खैरेंना पाडण्यासाठी लढतोय आणि हे मला पाडण्यासाठी निवडणूक लढवत आहेत, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी सभेत केला. मी पदाचा भुकेला नाही. दुसरा कोणी सक्षम उमेदवार असेल तर सांगा मी त्याला मतदान करेल. निवडणूक लढवणार नाही, असे सांगत समर्थकांशी चर्चा झाली. आता काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करू, असे सांगत त्यांनी अजून काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा असल्याचे दिसून आले. काँग्रेस नेत्यांशी बोलून एक तारखेला निर्णय जाहीर करू, असे काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.