Breaking News

दखल- घराणेशाही सर्वत्र पूज्यते!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीला पक्षात स्थान नसल्याचं ब्लॉग लिहून म्हटलं होतं. काँग्रेसच्या घराणेशाहीवर ते टीका ही करतात. वेगवेगळे आरोप करतात; मात्र आता भाजपत घराणेशाही झाली आहे. काँग्रेसच्या लोकांना सामावून घेऊन आता भाजपची काँग्रेस झाली आहे. वास्तविक भाजपला घराणेशाही नवी नाही. पूर्वी भाजपकडं सत्तेच्या चाव्या नव्हत्या. त्यामुळं भाजपची घराणेशाही दिसत नव्हती, एवढंच. आता तर भाजपनं घराणेशाहीच्या बाबतीत काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.

महाराष्ट्राचं राजकारण 169 कुटुंबांभोवती फिरतं. काँग्रेसकडं वर्षानुवर्षे सत्ता असल्यामुळं त्यांनी ठराविक कुुटुंबांकडं सत्ता ठेवली. अर्थात ही कुुटुंबं काँग्रेसला सत्ता मिळवून देणारी होती. त्यांच्याकडं संस्थात्मक, संघटनात्मक बळ होतं. काँग्रेसकडं सत्तेचे दावेदार वाढले. सर्वांना उमेदवार्‍या देणंही शक्य नव्हतं. त्यामुळं काही जण पर्याय शोधत होते. सुरुवातीच्या काळात असा पर्याय कमी होता, नंतर तो वाढत गेला. भाजप, जनता पक्षांत घराणेशाही नव्हती, असं नाही; परंतु ती कमी होती. पहिल्या पिढीत ती नव्हती. आता सत्तेच्या वर्तुळाचा परीघ जसा जसा वाढत गेला, तसातसा घराणेशाहीचा विस्तारही वाढायला लागला. राजकारण हे सामान्यांचं काम नाही. नगरपालिकापासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या एक इव्हेंट झाल्या आहेत. त्यासाठी संघटनात्मक बळ आणि कार्यकर्त्यांचं जाळं लागतं. ते सामान्यांकडं असत नाही. अशा वेळी वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या व्यक्तींकडं सत्तेची सूत्रं आपोआप जायला लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करीत असताना त्यांना त्यांच्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही. त्यावर ते काहीही बोलत नाही. वसुंधराराजे शिंदे-दुष्यंत शिंदे, गोपीनाथ मुंडे-पंकजा मुंडे-प्रीतम मुंडे, यशवंत सिन्हा-जयंत सिन्हा, गंगांधर फडणवीस-देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे-रक्षा खडसे, रावसाहेब दानवे-संतोष दानवे, संजय काकडे-सुभाष देशमुख, प्रमोद महाजन-पूनम महाजन, शंकरराव कोल्हे-स्नेहलता कोल्हे अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह व त्यांच्या मुलाचं उदाहरणही आहेच. भाजपच्या नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात आहे. त्यामुळं त्यांच्या घराणेशाहीचं प्रमाण कमी असू शकतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचं तसं नाही. त्यांच्या नेत्यांच्या चौथ्या पिढ्या राजकारणात आहेत. त्यामुळं त्यांची घराणेशाही दिसते. शिवसेनेतही घराणेशाही आहेच. पहिल्या पिढीनं सत्ता भोगली आता दुसर्‍या पिढीला सत्तेच्या चाव्या हव्या आहेत. शिवसेनेत गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात होती. गोव्यात आता माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला राजकारणात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. मोदी यांचा गुजरातही त्याला अपवाद नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहेच. इतरांनी खाल्लं तर ते शेण आणि आपण खाल्लं, तर ते श्रावणी असं भाजप आता दाखवतो आहे. 

मोदी यांच्याकडून काँग्रेसवर कायमच घराणेशाहीचा आरोप केला जातो. गांधी घराण्यानं देशावर राज्य केलं असं उदाहरण कायम मोदी हे त्यांच्या भाषणांमध्ये देत असतात. इतकंच नाही तर त्यावरून टीकाही करत असतात. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही, असा दावा करणार्‍या मोदी यांना हे बहुधा हे माहीत नाही, की लोकसभा निवडणुकांच्या वेळी जे उमेदवार भाजपनं दिले आहेत, त्यात घराणेशाही हा मुद्दा धरला तर भाजपनं काँग्रेसला मागं टाकलं आहे.

आता आता तर नेत्यांच्या मुलांपेक्षा बाहेरचा उमेदवारच भाजपला दिसत नाही. मागच्या लोकसभेच्या वेळी उमेदवारी दिलेल्या पूनम महाजन, हीना गावित यांच्यासह कितीतरी उमेदवारांची पार्श्‍वभूमी घराणेशाहीची होती. शिवसेनेतही एकनाथ शिंदे-श्रीकांत शिंदे, बाळासाहेब विखे-राधाकृष्ण विखे, शंकरराव काळे-अशोक काळे-आशुतोष काळे अशी उदाहरणं आहेत. निवेदिता माने-धैर्यशील माने, हिंदूराव निंबाळकर-रणजितसिंह निंबाळकर आदी उदाहरण तर अगदी अलीकडची आहेत. कोणताही राजकीय पक्ष घराणेशाहीवर टीका करू शकत नाही. त्याचं कारण निवडणुकीत विजय कोण मिळवून देतो, याला सर्वंच राजकीय पक्ष महत्त्व देत असतात. ठराविक घराण्याच्या पलीकडं सत्ता जात नाही, त्याला कारण ही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा मुळातच ठराविक कुटुंबांचाच पक्ष असल्यानं तिथं घराणेशाही जादा असणं स्वाभाविक आहे. या पक्षाच्या नेत्यांची तिसरी, चौथी पिढी राजकारणात आहे. पक्ष नवीन असला, तरी जुन्या नेत्यांचा त्यात जास्त भरणा असल्यानं तिथं घराणेशाही जास्त दिसते. शिवसेनेत त्या तुलनेत सर्वांत कमी घराणेशाही दिसते. भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 38 टक्के उमेदवार हे घराणेशाहीतले आहेत, तर काँग्रेसमध्ये हे प्रमाण 26 टक्के आहे. शिवसेनेत हे प्रमाण 30 टक्के आहे. राष्ट्रवादीचा आकडा सर्वाधिक म्हणजेच 59 टक्के इतका आहे; मात्र ज्या काँग्रेसवर सातत्यानं टीका केली जाते, त्या काँग्रेसपेक्षा भाजपची घराणेशाही जास्त आहे हेच दिसून येते.


भाजपच्या 23 उमेदवारांपैकी 9 उमेदवार हे घराणेशाहीतले आहेत. नंदूरबार लोकसभा मतदार संघातील हीना गावित या महाराष्ट्राचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धुळ्याचे माजी आमदार गोजराताई भामरे यांचे ते चिरंजीव आहेत. रावेर मतदारसंघातून दुसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जाणार्‍या रक्षा खडसे या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार या दिंडोरीचे माजी आमदार आणि मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जात असलेल्या पूनम महाजन या माजी दूरसंचारमंत्री प्रमोद महाजन यांच्या कन्या असून त्या पंकजा मुंडे यांच्या मामेबहीण आहेत. आता भाजपनं उमेदवारी दिलेल्या कांचन कुल यांचे पती राहुल कुल दौंडचे आमदार आहेत. त्यांच्या सासू कांचन कुल तसंच सासरे सुभाष कुल हे दौंडचे आमदार होते. सुजय विखे यांना भाजपनं पावन करून घेतलं. त्यांचे पणजोबा सहकारात अग्रणी होते. आजोबा खासदार, मंत्री होते, तर वडील राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. बीडच्या उमेदवार प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. 

काँग्रेसनं धुळे मतदारसंघातून कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते माजी कृषिमंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव आहेत. वर्ध्यातून लोकसभेला सामोरं जात असलेल्या चारुलता टोकस या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमधून लढत आहेत. ते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव आहेत, तर अशोकरावांच्या पत्नी नमिता आमदार आहेत. प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्याविरोधात लढत आहेत. त्या दिवंगत नेते, माजी खासदार सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा लोकसभेचे उमेदवार असून माजी मंत्री मुरली देवरा यांचे ते चिरंजीव आहेत. जालन्यातून विलास औताडे हे दानवे यांच्या विरोधात लढत आहेत. माजी आमदार केशवराव औताडे यांचे ते चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेची यादी विस्तार भयास्तव देत नाही; परंतु दोन राष्ट्रीय पक्षांची यादी पाहिली, तर भाजपला आता घराणेशाहीवर टीका करता येणार नाही.