Breaking News

सुदिन ढवळीकर यांची उपमुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी


पणजी : महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. ते अवघे 8 दिवस गोव्याच्या उपमुख्यमंत्रीपदी होते.गोव्यातील सत्तापालटाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक उलथापालथ होत आहेत. सकाळी महाराष्ट्र गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर अनेक घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. यातच पक्षाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली असून यामागील कारण कळू शकलेले नाही. 

दरम्यान, ढवळीकर यांच्या जागी आता भाजपात प्रवेश केलेल्या दीपक पाऊसकर यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. गोव्यात मध्यरात्री घडलेल्या राजकीय घडामोडीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर अशी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांची नावे आहेत. त्यांनी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचे पत्रही गोवा विधानसभेचे सभापती मायकल लोबो यांना सादर केले आहे. परराज्याच्या दौर्यावर असलेल्या राज्यपाल बुधवारी संध्याकाळी राज्यात परतणार आहेत. या दरम्यान, मगोच्या केंद्रीय कार्यकारिणीची दुपारी बैठक होणार असून त्यात मगो काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मगो पक्ष फोडण्याचा याआधीही प्रयत्न झाले होते, मात्र त्यामुळे पक्षाचे फारसे नुकसान झाले नसले तरी ज्यांनी पक्षांतर केले ते मात्र राजकारणातून नाहिसे झाले आहेत. याआधी काँग्रेसचे मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांची सत्ता असताना मगोतील रमाकांत खलप आणि प्रकाश वेळीप या आमदारांनी मगो सोडला होता. हे दोन्ही राजकारणी आजपर्यंत पुन्हा निवडून आले नाहीत. तसेच बहुमतात असूनही फालेरो यांचे सरकार सहा महिन्यात कोसळले होते, याची लोकांनी आठवण ठेवावी. आज आपण मोकळा झालो आहे. मगो हा जनमानसात रूजलेला पक्ष आहे. भर मध्यरात्री चौकीदारांनी मगो पक्षावर घातलेला हा दरोडा पाहून गोमंतकीयही अचंबित झाले आहेत.

‘चौकीदारांचा’ महाराष्ट्रवादी गोमंतकवर दरोडा : ढवळीकर 

विधानसभा परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ढवळीकर म्हणाले, आज मी तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे देणार नाही. तर माझ्या मनातील गोष्ट सांगतो. आज मला मुक्त झाल्यासारखे वाटत आहे. ’शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ या प्रमाणे मगो हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. या पक्षावर ’ चौकीदारांनी’ मध्यरात्री कसा दरोडा घातला हे गोमंतक जनता पाहत आहे.महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी बुधवारी पहाटे भाजपमध्ये प्रवेश करत सरकारला पाठिंबा दिला. यावर बोलताना महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो)पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, मगो हा सर्वसामान्यांचा पक्ष असून ’चौकीदारांनी’ मध्यरात्री पक्षावर दरोडा घातला आहे. उपसभापती मायकल लोबो यांच्या उपस्थितीत आज पहाटे मगोचे आमदार तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर आणि गोवा साधन सुविधा महामंडळ अध्यक्ष दीपक पावसकर यांनी सरकारला पाठिंब्याचे पत्र देत भाजपमध्ये प्रवेश केला.