Breaking News

‘नकोशा’ अनाथांची परवड थांबणार ’शांतिवन’ मध्ये शिशुगृहाला मंजूरी


शेवगांव/प्रतिनिधी
जन्मदात्यांनाच ’नकोशा’ झालेल्या चिमुकल्यांना अनेकदा रस्त्यावर टाकून देण्याचे प्रकार होतात. मात्र, या शिशूंसाठी जिल्ह्यात एकही शिशुगृह नव्हते. त्यामुळे इतर जिल्ह्यात त्यांना पाठवले जायचे. मात्र, आता या अनाथ चिमुरड्यांची परवड थांबणार असून ’शांतिवन’ सामाजिक प्रकल्पात शिशुगृह सुरु करण्यास राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी परवानगी दिली आहे. ‘सुलभा सुरेश जोशी शिशूगृह’ आता नकोशा चिमुरड्यांचे घर बनणार आहे.

अनाथ, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी सन 2000 मध्ये आर्वी येथे दीपक व कावेरी नागरगोजे या दांम्पत्याने सुरु केलेला शांतिवन प्रकल्पाने 19 वर्षांच्या वाटचालीत रचनात्मक कार्याचे नवे मॉडेल उभे केले आहे. केवळ ऊसतोड कामगारांची मुलेच नाही तर आत्महत्याग्रस्त शेतकरी, रेड लाईट एरिया, तमाशा कलावंत, लोककलावंत व अनाथ मुलांना शांतिवनने मायेची ऊब दिली आहे. मात्र, जिल्ह्यात अनेकदा जन्मत:च मुलांना टाकून देण्याचे प्रकार मागील काही वर्षात सातत्याने घडत आहेत. जन्मदात्यांनाच ’नकोशा’ झालेल्या या अनाथ चिमुकल्यांना बालकल्याण समितीमार्फत शासनमान्य शिशुगृहात ठेवण्यात येते. पूर्वी जिल्ह्यात एक शिशूगृह होते मात्र, काही वर्षांपूर्वी ते बंद पडले. त्यानंतर जिल्ह्यात एकही शिशूगृह नसल्याने जिल्ह्यात सापडणार्‍या चिमुकल्या जीवांची परवड होत होती. अनेकदा बालकल्याण समितीला दोन तीन जिल्ह्यांत विचारणा करुन जिथे जागा असेल तिथे त्यांना पाठवावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शांतिवनने शिशुगृहासाठी महिला बालकल्याण विभागाकडे अर्ज केला होता. नुकतीच ‘सुलभा सुरेश जोशी शिशूगृह’ सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे सापडलेल्या चिमुकल्यांची परवड थांबणार आहे.


शून्य ते सहा वर्षे
शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी या शिशुगृहाचा उपयोग होणार आहे. जन्मदात्यांनीच टाकून दिलेल्या अनाथ मुलांना बालकल्याण समितीच्या आदेशानंतर शिशूगृहात प्रवेश देत त्यांचे पालन पोषण केले जाईल. 25 मुलांसाठी ही परवानगी दिली गेली आहे.

शांतिवन स्विकारणार पालकत्व
सहा वर्षे वयोगटापर्यंत शिशूगृह असते यानंतर इथे असलेल्या मुलांना शांतिवनच्या शाळेत प्रवेश देऊन त्यांचे पालकत्व शांतिवन स्विकारणार आहे. जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी असल्याची प्रतिक्रिया शांतिवनचे दीपक नागरगोजे यांनी दिली.