Breaking News

15 लाखांबाबत मोदी काहीच बोलले नव्हते; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; काँग्रेस बेजाबदार, भाजप जबाबदार असल्याचा दावामुंबई / प्रतिनिधीः
प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेच नव्हते, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तुम्ही कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा संकल्पपत्र काढून बघा. मोदींनी कधीच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार असे सांगितलेले नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देताना संवेदनशील पंतप्रधान आणि संवेदनशील पक्षाने समाजाची आवश्यकता लक्षात घेऊन तयार केलेले संवेदनशील संकल्पपत्र असल्याचे त्यांनी सांगितल. काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेवरही फडणवीस यांनी टीका केली. ‘राहुल गांधींच्या योजनेला कोणीही गांभीर्याने घेतलेले नाही. निवडणुका आल्यावर घोषणा करायच्या आणि त्यांची अंमलबजावणी करायची नाही, हा काँग्रेसचा इतिहास आहे. आपली योजना राबवणार कशी, हे राहुल गांधी सांगू शकलेले नाहीत’, असे ते म्हणाले.

काँग्रेसला आपण निवडून येणार नाही हे माहिती आहे. त्यामुळे ते प्रत्येक गरिबाला ताजमहाल बांधून देऊ, प्रत्येकाच्या घरी ओढा तयार करून देऊ असे आश्‍वासन देऊ शकतात, असा टोला फडणवीस यांनी लगावला. आम्ही जबाबदार पक्ष आहोत. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे एखादा संकल्प जाहीर करताना त्याची तरतूद करावीच लागेल असे त्यांनी सांगितले. भाजपच्या संकल्पपत्रात राम मंदिराच्या पुनरुच्चार करण्यात आला असून फडणवीस यांनी राम मंदिर हा आस्थेचा प्रश्‍न असून राम मंदिराच्या बाजूनेच सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

मनसे नव्हे उनसे

या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड, मनसे आता उनसे झाली, म्हणजे उमेदवार नसलेली सेना असा टोला लगावला. राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात विष पेरण्याचा प्रयत्न केला असा आरोपफडणवीस यांनी केला. मराठा समाजाच्या मोर्चानंतर कोणी हिंसा पसरवली? ‘सोशल मीडिया’वर हिंसा कोणी भडकवली? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.