Breaking News

वीज कोसळून दोन मेंढपाळांसह 40 शेळ्यांचा मृत्यू;एक मेंढपाळ जखमी


परभणीः पाथरी तालुक्यातील अंधापुरी गावात सोमवारी (15 एप्रिल ) सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास वादळी वार्‍यांसह झालेल्या विजेच्या कडकडाटात झाडावर वीज कोसळून झाडाखाली थांबलेल्या 40 शेळ्यांसह दोन मेंढपाळांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर एक मेंढपाळ गंभीररीत्या भाजला आहे.

बीड जिल्ह्यातील सुनवाडी (ता. धारूर) येथील शेळीपालक रामभाऊ साधू शिंदे (वय 50, ) बाळू सीताराम काळे ( वय 35 ) कृष्णा रामभाऊ शिंदे ( वय 18 ) हे गेल्या दीड महिन्यापासून अंधापुरी गावात शेळ्या घेऊन राहत होते. सरपंच चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या शेतात हे शेळीपालक आपल्या शेळ्यांसह सोमवारी झाडाखाली थांबले होते. सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. याच वेळी मेंढपाळ थांबलेल्या झाडावर वीज कोसळली. यात 40 शेळ्यांसह दोघे मेंढपाळ ठार झाले. बाळू सीताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे या दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. रामभाऊ साधू शिंदे हे गंभीररित्या भाजले.