Breaking News

आझम खानची उमेदवारी रद्द करा


मुंबई : अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात अश्‍लील वक्तव्य करणार्‍या आझम खान यांची उमेदवारी रद्द् करावी, अशी मागणी रेणुका शहाणे यांनी केली. शहाणे यांनी आझम खानच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. अशा व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये अशी मागणी त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.

उत्तरप्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून आझम खान यांच्याविराधात जयाप्रदा निवडणूक लढवत आहे. येथील एका प्रचारसभेत आझम खान यांनी जयाप्रदा विषयी आक्षपार्ह वक्तव्य केले. आझम खान यांच्या वक्तव्याचा सर्वच थरांतून निषेध व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने देखील आझम खान यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात कारवाई करत 72 तासांची प्रचारबंदी केली आहे. दरम्यान, रेणुका शहाणे यांनी ट्विटरवरुन आझम खान यांच्याविरोधात टीका केली आहे.

महिलांचा आदर न करता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या आझम खान सारख्या व्यक्तींना कदापी निवडणुकीचे तिकीट देता कामा नये. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. तर त्यांच्याविरोधात प्रत्यक्षात कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई नक्की होईल का? हा प्रश्‍न आहे. मुळात त्यांना 2019 ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये, असे ट्विट करत रेणुका शहाणे यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना या ट्विटमध्ये टॅग केले आहे. रेणुका शहाणे यांनी काही दिवसांपूर्वी एम.जे. अकबर यांच्यवर देखील ट्विटरवरून टीका केली होती. भाजपने ट्विटरवर एक नविन मोहिम सुरु केली. 

‘मैं भी चौकीदार’ हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विटरवर भाजपने मोहिम सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर आपले नाव बदलून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले. मोदींशिवाय भाजपमधील नेत्यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावापुढे चौकीदार असे लिहिले. भाजपचे नेते एम. जे.अकबर हे देखील या मोहिमेत सहभागी होत त्यांनी यावर ट्विट केले होते. या ट्विटनंतर रेणुका शहाणे यांनी एम जे अकबरांवर टीका केली. ‘तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’ अशी टीका त्यांनी केली होती.