Breaking News

‘स्वच्छ-सुंदर सातारा आहे कुठे?’

Image result for ‘स्वच्छ-सुंदर सातारा

गल्लोगल्लीचा कचरा घंटागाडीत मात्र चौकाचौकातील कचरा उघड्यावर
सातारा/ प्रतिनिधी : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणांतर्गत सहभागी झालेल्या सातारा नगरपालिकेने तयार केलेले स्वच्छ सातारा, सुंदर सातारा हे गीत पहाटेपासून सातारकरांच्या कानात रुंजी घालत असले तरी प्रत्यक्षात मात्र स्वच्छ सातारा, सुंदर सातारा कुठे आहे? असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. गल्लोगल्लीचा कचरा घंडागाडीत जात असताना चौकाचौकातील कचरा मात्र तसाच पडून राहत आहे. मग नेमका स्वच्छ अन सुंदर सातारा कुठे आहे
शहरातील बहुतांशी सर्व पेठांमध्ये पहाटेपासूनच पालिकेच्या घंटागाड्या कचरा गोळा करण्यासाठी फिरत असतात. त्या घंटागाड्यावर स्वच्छ सातारा सुंदर सातारा हे गीत नेहमीच आळवले जाते. त्यामुळे सातारकर स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे ही समाधानाची बाब असली तरी दुसर्‍या बाजूला असा गल्लोगल्लीचा कचरा गोळा करुन सातारा स्वच्छ करणार्‍या पालिकेला चौकाचौकात पडलेला ओंगळवाणा कचरा मात्र दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील राजवाडा, जुना मोटार स्टॅण्ड, पोवईनाका, ग्राहकबझार येथील मंडईच्या बाहेर सर्रास सडलेल्या नासलेल्या भाज्यांचा ढिग पडलेले आढळतात. तसेच काही चौकात असलेले हॉटेलवाले आपला कचरा बिनधास्तपणे नजीकच्या ठिकाणी स्वच्छ सातारा सुंदर सातारा या उपक्रमाचे तीन तेरा वाजवत आहेत.
ज्याठिकाणी पूर्वी पालिकेने कचराकुंड्या ठेवल्या होत्या, त्या काढून टाकण्यात आल्या असल्यातरी नागरिक त्याच ठिकाणी आपल्या घरातील कचरा आणून टाकत आहेत. तालीम संघासमोरील जुन्या सरकारी दवाखान्यानजीकच्या चौकात नेहमीच याच परिसरातील नागरिक आपल्या घरातील ओला व सुका कचरा पुन्हा टाकू लागल्याने हा चौक दुर्गंधीने ओसंडून वाहत आहे. तीच परिस्थिती बसस्थानक परिसरातील हॉटेलवाल्याकडून होत आहे. येथील हॉटेलवाले आपल्या हॉटेलातील खरकटे, वाया गेलेले अन्न पारंगे चौकात उघड्यावर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने आतापर्यंत यातील एकाही हॉटेलचालकाला दंड केल्याचे ऐकिवात नाही.

बहुतांश ठिकाणी असलेल्या ओढ्यात कचरा टाकण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे चित्र आहे. अनेक नागरिक चारचाकी, दुचाकी थांबवून ओढ्यात कचर्‍याच्या पिशव्या टाकताना आढळतात. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांमध्ये कचर्‍याचे ढिग साचले आहेत. गत पावसाळ्याच्या आधी एक महिना ओढा स्वच्छ केल्यानंतर पालिका पुढील वर्षी तो ओढा साफ करण्यासाठी येत असल्याने मधल्या कालावधीत त्या ओढ्याची काय परिस्थिती आहे याच्याशी पालिकेला काहीही देणघेण राहिलेले नाही.