Breaking News

डॉ. आंबेडकरांनी संविधानामार्फत लोकशाही बळकट केली:पवार


राहुरी/प्रतिनिधी: देशाच्या संविधानामध्ये माणसाची प्रतिष्ठा आणि देशाची एकता अखंड टिकविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. जगण्याचे आणि विचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हाच संविधानाचा गाभा आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि स्वातंत्र्याची चळवळ निर्माण केली. संविधानामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीबळकट केली असल्याचे प्रतिपादन फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश पवार यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश पवार बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते. यावेळी व्यासपीठावर संचालक संशोधन तथा संचालक विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, निम्नस्तर कृषीशिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब भारुड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहाण आणि प्रा. दिलीप गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि बुध्द वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

अक्षयक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी संविधानातून आणि त्यांच्या जीवनचरित्रातून मानवतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण प्रत्यकाने अमलात आणली तर जगात सर्व जाती धर्मांमध्ये बंधुत्व आणि प्रेम निर्माण होईल. संचालक संशोधन तथा संचालक विस्तार शिक्षण डॉ. शरदगडाख यांनी प्रास्ताविक केले . आभार डॉ. महाविरसिंग चौहाण यांनी मानले . सूत्रसंचालन जससिंग सोळंके यांनी केले. या कार्यक्रमाला विभाग प्रमुख, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.