Breaking News

उदयनराजेंनी स्विकारले नरेंद्र पाटलांचे आव्हान


सातारा/ प्रतिनिधी : चॅलेंज ऍक्सेप्ट... त्यांना आम्ही कुठेही गाठू शकतो.... ते देखणे आहेत म्हणून बघायला जायचे की चर्चेला जायचं, अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी कोरेगाव येथे झालेल्या सभेत दिलेले आव्हान स्विकारले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, चंद्रकांतदादांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेत त्यांनी दादांना पदवीधर आमदार होण्यासाठी केलेली मदत ते विसरले असल्याचा टोला लगावला.

आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथं येईन, असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना शुक्रवारी कोरेगाव येथे सभेत दिले होते. याबाबत रविवारी निर्धारनाम्याच्या प्रकाशनानिमित्त आयोजित महाराजा हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये या दोघांचा समाचार घेतला.

याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, ते देखणे आहेत म्हणून त्यांना बघण्यासाठी जायचे की, चर्चेला जायचे? माझी दहशत आहे असे त्यांचे म्हणणे असेल तर माझी दहशत नाही हे कितीवेळा सांगायचे? त्यांचे मात्र, आधी मिशीला पिळ, नंतर माथाडीला पीळ आणि नंतर गीळ... असा उपक्रम असल्याचा सांगत आम्ही त्यांना कुठेही गाठू शकतो. मात्र ती वेळ आता नाही. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही राजाने राजासारखं राहावं असे वक्तव्य केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर उदयनराजे म्हणाले, माझे मन राजासारखं आहे.मी मनानं राजा आहे. दादांना पदवीधर मतदारसंघातून आमदार होण्यासाठी केलेली मदत ते विसरले आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.