Breaking News

अचानक आलेल्या पावसामुळे छावण्यातील शेतकर्‍यांची तारांबळ


पाथर्डी/प्रतिनिधी : गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दोन दिवसांपासुन होत असलेल्या पावसाने थोडासा दिलासा मिळाला असला तरी शहरासह तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांना विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे छावण्यातील शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पाथर्डी शहर व तालुक्यात गेल्या महिनाभरापासून गर्मीने नागरिक प्रचंड हैराण झाले होते. 

सोमवारी सकाळपासून तालुक्यात व शहरात पावसाने हजेरी लावली. तर सायंकाळी झालेल्या पहिल्याच पावसात लहान-लहान मुलांनी भिजण्याचा व खेळण्याचा आनंद लुटला. तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी, मोहरी, करोडी, चिंचपूर ईजदे, वडगाव, चिंचपूर पांगुळ, पिंपळगाव टप्पा, माणिकदौंडी यासह आसपासच्या विविध गावात दिवसभरात पाऊस झाला.विजेच्या कडकडाट व जोरदार वार्‍यामुळे शेतकर्‍यांची पळापळ झाली. थोड्याफार झालेल्या पावसामुळे पशु-पक्षी, विविध प्राणी यांना तात्पुरता दिलासा मिळणार असून पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर थोड्या फार प्रमाणात होत असल्याने सध्या गारवा अनुभवला मिळत आहे.