Breaking News

पुनम सिन्हांचा समाजवादी पक्षात प्रवेश


लखनौ : काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश केला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादवांच्या पत्नी डिम्पल यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाची प्राथमिक सदस्यता ग्रहण केली. त्या लखनौ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असून, पूनम सिन्हा 17 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी 6 एप्रिलला शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला राम-राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ‘शॉटगन’ म्हणून देशभरात ओळखले जाणार्‍या शत्रुघ्न सिन्हांनी 6 एप्रिलला भाजप सोडली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर आता त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा राजकारणात उतरल्या आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश न करता समाजवदी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्ष पूनम सिन्हांना लखनौ लोकसभा मदतार संघातून उमेवारी जाहीर करू शकते. तर, शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहिब येथून निवडणूक लढवणार आहेत. लखनौ लोकसभा मतदार संघातून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवणार आहेत. पूनम सिन्हा यांच्या रिंगणात आल्यामुळे आता येथे काट्याची टक्कर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या लोकसभा मतदार संघात 6 मे ला मतदान होणार आहे.
काँग्रेसकडून राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध कोणी लढण्यास तयार दिसत नाही. या मतदारसंघातून काँग्रेस एका ब्राह्मण चेहरा देण्याचा विचार करत होती. 

यासाठी त्यांनी जतीन प्रसाद यांना देखील ऑफर दिली होती. पण प्रसाद यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने प्रमोद कृष्णम आणि हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि महाराज यांना देखील ऑफर दिली. पण या दोघांनी नकार दिल्याचे समजते. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लखनऊ मधून कोणताही उमेदवार न देण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे मत विभाजन होणार नाही. पूनम सिन्हा यांना उमेदवारी देण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे या मतदारसंघात दीड लाख मतदार हे कायस्थ आहेत. त्याच बरोबर शत्रुघ्न यांचा स्टारडम देखील उपयोगी पडू शकतो. पूनम सिन्हा या सिंधी कुटुंबातील असून या मतदारसंघात त्यांची संख्या देखील मोठी आहे.

लखनौ मतदारसंघ

गेल्या दोन दशकापासून लखनौ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. या मतदारसंघातून भाजपचा पराभव करण्यासाठी सपा आणि काँग्रेस नेहमीच प्रयत्न करत असतो. पण अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना कधीच यश मिळवून दिले नाही. 2007 मध्ये वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर 2009मध्ये लालजी टंडन यांनी येथून विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये राजनाथ सिंह यांनी मोठा विजय मिळवला होता.