Breaking News

वरकुटे-मलवडीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ


वरकुटे मलवडी / सुषमा सरतापे : श्री विठ्ठलाच्या कृपेने व श्री.संत नामदेव (नामाशेट्टी) महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वरकुटे मलवडी येथे गेल्या 32 वर्षाची परंपरा जतन करीत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी श्रीराम नवमीच्या निमीत्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
यावेळी शनिवार 13 एप्रिल ते 19 एप्रिल रोजी हनुमान जयंतीअखेर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन श्री.हनुमान मंदिर वरकुटे-मलवडी या ठिकाणी करण्यात आले आहे.

या सोहळ्यात पहाटे काकड आरती, ग्रंथवाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनसेवा व हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. हभप वैष्णवी लोहार, सुवर्णाताई गायकवाड, विष्णूपंत जाधव, गणेश मानेमहाराज, आनंद सिद्ध महाराज, श्री ढोले, वैभव मोरे, जानकर महाराज, नामदेव महाराज, गेंडमहाराज, भिमराव हंडे, बलभिमराव राऊत यांची प्रवचने आणि कीर्तन सेवाहोणार आहेत.

त्याचबरोबर शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सकाळी बलभिमराव राऊत यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर ढोल,लेझीम ताशांच्या गजरात माऊलींच्या पालखीसह नगरप्रदक्षिणा होईल व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल. वैभव महादेव बनसोडे यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

याप्रसंगी कलश, गाथा आणि विणा पूजन होणार असून बनगरवाडी, महाबळेश्र्वरवाडी, कुरणेवाडी,शेनवडी व पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांनी उपस्थिती राहून ज्ञानबोध घ्यावा. असे अवाहन अखंड हरिनाम सप्ताह समिती वरकुटे मलवडीच्या वतीने करण्यात आले आहे.