Breaking News

अग्रलेख- डोळ्यांत अंजनभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना वयाचे कारण दाखवून उमेदवारी नाकारण्यात आली, तेव्हा डॉ. जोशी यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पत्र लिहून भाजपने आपला कसा अवमान केला आहे, हे निदर्शनास आणले. त्यांनी भाजप कार्यालयात जाऊन उमेदवारी नाकारण्यास नकार दिला. उमेदवारी नाकारण्याचा पक्षाला हक्क असला, तरी ज्येष्ठांना सन्मानाने निवृत्ती द्यायला हवी, हे त्यांचे म्हणणे चुकीचे नव्हते. अडवाणी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली; परंतु त्यावर त्यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनाला दोन दिवस राहिले असताना त्यांनी ब्लॉग लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात त्यांच्या मनातील खदखद व्यक्त झाली. जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक असलेल्या अडवाणी यांना वयाच्या कारणामुळे लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्याबद्दल त्यांना खेद नाही. त्यांनी ब्लॉगमध्येही राष्ट्र, पक्ष आणि नंतर व्यक्ती असा जो क्रम लावला आहे, तो महत्त्वाचा आहे. त्यांच्या ब्लॉगमधील नेमक्या याच ओळीचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले असले, तरी ते त्यांच्या सोईचे आहे. 

अडवाणी यांनी उपस्थित केलेले अन्य मुद्दे जास्त महत्त्वाचे असून त्यावर मोदी यांनी भाष्य केले असते, तर ते अधिक चांगले झाले असते; परंतु तेवढी हिमंत ते दाखवू शकणार नाहीत. गेल्या वेळी निवडून आल्यानंतर अडवाणी यांना जाणीवपूर्वक बाजूला सारण्यात आले. मार्गदर्शक मंडळात वर्णी लावण्यात आली; परंतु अडवाणी यांच्याकडे मार्गदर्शन मागण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कुणीच गेले नाही. अडवाणी यांना उमेदवारी नाकारायचीच होती, तर त्यांना विश्‍वासात घेऊन तसे सांगता आले असते. त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाला उमेदवारी देता आली असती; परंतु भाजपने तसे केले नाही. खरेतर वय हा कार्यक्षमतेचा निकष ठरत नाही. शरद पवार, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आदींनी आपली कार्यक्षमता आणि वय यांचा संबंध कधीच येऊ दिला नाही. अडवाणी हे ही त्या परंपरेत बसणारे नेते आहेत.


अडवाणी यांचा ब्लॉग वाचला, तर त्यात अनेक अर्थ दडलेले आहेत. मोदी आणि त्यांच्या भक्तांना अडवाणी यांनी व्यक्त केलेल्या भावना नक्कीच झोंबणार्‍या असतील; परंतु सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी त्यांची स्थिती झालेली दिसते. भाजप कसा नव्हता आणि तो आता कसा झाला आहे, सत्ताधारी आणि विरोधकांतले संबंध कसे असायला हवेत आणि आता ते कोणत्या पातळीपर्यंत खालावले आहेत, हे
अडवाणी यांनी या ब्लॉगमधील मजकुरात विशद केले आहे. ज्या इंदिरा गांधी यांच्यावर गुंगी गुडिया म्हणून वाजपेयी, अडवाणी यांनी टीका केली होती, त्याच इंदिरा गांधी यांनी जेव्हा जगाच्या नकाशावर एक नवा देश निर्माण केला, तेव्हा इंदिराजींना दुर्गा असे संबोधून कौतुकातही कसर ठेवली नव्हती. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर नरसिंह राव यांनी वाजपेयी यांची संयुक्त राष्ट्रसंघात भारताची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली होती. विरोधी पक्षनेते असलेल्या शरद पवार यांच्याकडे आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोपवून भूजच्या पुनर्वसनाची जबाबदारी दिली होती. सत्ताधारी पक्षांनी विरोधकांवर जबाबदारी सोपविली, त्याचे कारण सत्ताधारी पक्षाकडे कोणी जबाबदार व्यक्ती नव्हत्या असे नाही, तर त्यांच्यापेक्षा विरोधी नेत्यांची क्षमता, त्यांचे वलय आणि देशहितासाठी त्यांचा फायदा करून घेण्याची सरकारची इच्छा हे होते. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात असे संबंध असले, तरच देशाचा गाडा पुढे जाऊ शकतो; परंतु आता विरोधी पक्ष नको, काँग्रेसमुक्त भारत हवा, अशी मानसिकता असल्याने आणि खुनशी राजकारण सुरू झाल्याने अडवाणी यांनी यांना ब्लॉगमधून जो संदेश द्यायचा आहे, तो नक्कीच व्यवस्थित दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचा उद्या स्थापनादिन. त्याच्या दोन दिवस अगोदरच अडवाणी यांनी ब्लॉग लिहून पूर्वीचा भाजप आता राहिलेला नाही, हे निदर्शनास आणले आहे. त्यांचा रोख मोदी आणि अमित शाह यांच्या दिशेने आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपने यापूर्वी कधीही राजकीय विरोधकांना राष्ट्रविरोधी अथवा शत्रू समजले नाही, अशा शब्दांत अडवाणी यांनी खंत व्यक्त केली. 

राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्द्यांना हात घालताना आपण तेवढे राष्ट्रप्रेमी आणि इतर देशद्रोही अशी विभागणी मोदी, शाह करीत आहेत. ती अडवाणी यांना मान्य नसल्याचे त्यांच्या ब्लॉगमधून स्पष्ट होते. अडवाणी यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या काळातील भाजप आणि सध्याचा भाजप यांच्यातील तुलनात्मक फरक विषद केला आहे. ते लिहितात, ‘भाजपने सुरुवातीपासूनच राजकीय विरोधकांना शत्रू समजले नाही. ज्यांना भाजपची विचारधारा मान्य नाही, त्यांना कधीच राष्ट्रविरोधी ठरवले नाही. नागरिकांच्या वैयक्तिक आणि राजकीय पसंतीला स्वीकारण्याची भाजपची भूमिका असायची.’ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सध्या जी गळचेपी चालू आहे आणि त्याविरोधात देशात जो सूर आळवला जात आहे, त्यावर अडवाणी यांनी नेमके बोट ठेवले आहे. अडवाणी यांच्या लिखाणातून पूर्वीचा भाजप राहिला नाही, असे सूचित होते. या ब्लॉगमध्ये अडवाणी यांनी विरोधकांना देशद्रोही किंवा शत्रू समजण्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या ब्लॉगसंदर्भात भाष्य केले. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की अडवाणीजींनी भाजपच्या विचारांचा मूळ गाभा नेमकेपणाने लोकांसमोर मांडला. देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि सर्वात शेवटी स्वत:चा विचार हाच भाजपचा मूलमंत्र आहे. अर्थात मोदी यांच्यापुढे अडवाणींच्या ब्लॉगचे कौतुक करण्याशिवाय अन्य पर्यायही नव्हता. अडवाणी यांनी भाजपची आजवरची वाटचाल आणि पक्षीय संस्कृती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिल्याचेही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते. आताच्या मोदी सरकारवर सातत्याने संविधानिक संस्थांची गळचेपी, वेगवेगळ्या संस्थांमध्ये हस्तक्षेप, सैन्यासह अन्य बाबींचा राजकारणासाठी वापर असे आरोप होत आहेत. 

त्या पार्श्‍वभूमीवर अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनादिनाच्या दोन दिवस अगोदरच पक्ष आणि सरकार चालवणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घातले हे बरे झाले. भाजपमध्ये आपल्या सर्वांसाठी मागे वळून पाहण्याची, पुढे पाहण्याची आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक संधी आहे, असे अडवाणी यांनी जे म्हटले आहे, ते अतिशय महत्वाचे आहे. भारतीय लोकशाहीचे सार अभिव्यक्तीचा आदर आणि यातील विविधता आहे, असे अडवाणी यांनी म्हटले आहे, तेच तर देशातील विचारवंत गेल्या तीन वर्षांपासून म्हणत आहेत. अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून का होईना मौन सोडून सध्याच्या नेत्यांच्या डोळ्यांत अंजन घातले हे चांगले केले.