Breaking News

उदयनराजे समर्थकांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी


सातारा/ प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक सुनील काटकर, ऍड. अंकुश जाधव व पंकज चव्हाण व काही जणांनी माझे अपहरण केले तसेच निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करुन माझ्या समोर लाखो रुपये टाकून त्याचे चित्रीकरण करत ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची माहिती लोकसभेचे सातारा व सांगलीचे उमेदवार अभिजीत बिचकुले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. माझ्या जिवीताला धोका असल्याने मला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना बिचुकले म्हणाले, मी 13 रोजी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलो असताना उदयनराजे समर्थक सुनील काटकर यांनी मला गोड बोलून त्यांच्या गाडीत बसवून ते राहत असलेल्या देवी कॉलनीतील घरी नेले. त्याठिकाणी ऍड. अंकुश जाधव, पंकज चव्हाण यांच्यासह काही पैलवान उपस्थित होते. बेडरुमध्ये नेले व माझ्यासमोर लाखो रुपयांची बंडले टाकून आमिष दाखवत उदयनराजेंना पाठिंबा देण्याची मागणी केली व स्वत:चा प्रचार करु नकोस असे धमकावले. मी पाठिंबा देण्याचे व पैसे घेण्याचे नाकारल्यानंतर पंकज चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी नोटांची बंडले बळजबरीने माझ्या हातामध्ये देवून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. इतर साथीदारांनी माझे पैसे हातात घेतले असतानाचा फोटो काढले. 

मी जर माझ्या उमेदवारीचा प्रचार केला तर हे फोटो व चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकीही मला यावेळी देण्यात आल्याचे बिचुकले यांनी सांगितले. तसेच याउपरही मी प्रचार केल्यास पंकज डान्स गु्रपमधील तरुणी व महिलांकडून माझ्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल केले जातील अशी धमकीही मला देण्यात आली. तसेच सुनील काटकर यांनी तू सांगली, सातारा व पत्नी बारामतीमधून उभे आहात तिथे शरद पवार व अजित पवारांना सांगून तुला आयुष्यातून उठवू, तू मुकाट्याने आमचे ऐक अन्यथा तुझ्या अब्रुची लक्तरे होताना बघ, माझ्या नादाला लागू नकोस असेही त्यांनी यावेळी धमकावल्याचे बिचुकले यांनी सांगितले. तर पंकज चव्हाण याने व्हिडीओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. तर यावेळी तिथे उपस्थित असलेले ऍड. अंकुश जाधव यांनी मी जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्ष असून मी न्यायाधिशांनाही मॅनेज करतो. सरकारी कायद्यात हस्तक्षेप केल्याचे गुन्हे दाखल करुन तुला जेलमध्ये टाकीन, तुझ्या जातीच्या लायकीप्रमाणे राहा, राजेंच्या, पवारांच्या,काटकरांच्या व जाधवांच्या नादी लागू नकोस अशी धमकी दिल्याचे बिचकुले यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन दिले असून या सर्व संंबंधितांवर प्रचार करण्यास मनाई केल्याबद्दल तसेच अपहरण करुन ब्लॅकमेल व ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.