Breaking News

वंचीत आघाडी जोमात;राष्ट्रवादी गेली कोमात


अपक्षांना आला थकवा,शिवसेनेसमोर मंथनची अपरिहार्यता

Image result for वंचित आघाडी logo

नाशिक/प्रतिनिधी

महाराष्ट्रभर निर्माण झालेला वंचित आघाडीचा झंझावात नाशिक लोकसभा मतदार संघातही परिणामकारक लढतीत आल्याचे चिञ दिसू लागल्याने लाज कशी वाटत नाही चा जप करणारे कोमात गेल्याचे संकेत मिळत आहेत.दुसर्या बाजुला मैञीपुर्ण लढतीचा बालीश पर्याय ठेवणारे आणि पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर सुरूवातीचे दोन दिवस बाह्या सावरून मैदान गाजवणार्या अपक्षांनाही थकवा जाणवू लागल्याचे दिसत आहे.भाजपसेनेच्या गोटात विशेषतः शिवसेनेअंतर्गत असलेली नाराजी दुर करण्यात मातोश्रीवरून झालेले प्रयत्न यशस्वी झाले असले तरी भाजपातील काही अल्पसंतुष्ट, प्रहार आणि काही मराठा संघटनांनी धरलेली अपक्षांची कास युतीला मंथन करण्यास प्रवृत्त करीत आहे.

येत्या २९ एप्रीलला नाशिक लोकसभा मतदार संघासाठी मतदान होत असले तरी या मतदार संघात अपक्षांसह प्रस्थापीत राजकीय पक्षांच्या प्रचार छावणीत हवा तेव्हढा उत्साह जाणवत नाही.

युतीच्या जागावाटपात नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने भाजपाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले सिन्नरचे माजी आ.माणिकराव कोकाटे यांची घोर राजकीय निराशा झाली.या निराशेतून बाहेर पडण्याची धडपड करताना माणिकराव कोकाटे यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी करून शिवसेनेशी मैञीपुर्ण लढत करण्याची इच्छा प्रदर्शीत केली होती.कुठल्यातरी मार्गाने लोकसभेच्या सभागृहात पाय ठेवायचा असा हट्ट करणार्या माणिकराव कोकाटे यांचा मैञीपुर्ण हट्ट पुरवण्यासाठी युती धर्म संकटात टाकण्यास भाजपाच्या श्रेष्ठींनी नकार दिल्याने हट्टाला पेटलेल्या माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारीचा हट्ट पुरवून घेतला.आपल्या उमेदवारीचे समर्थन करताना आजी माजी खासदार असलेल्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर हवे तसे तोंडसुख घेण्यास सुरूवात केली आहे.या लोकसभा मतदार जे काही थोडेफार विकास कामे झाली आहेत त्या विकास कामांसह न झालेल्या किंवा संबंधीत कामांशी दुरान्वयेही संबंध नसतांना कार्यक्षेञाबाहेर जाऊन ती सर्व कामे मीच केल्याचा जप सुरू केला आहे.

अपक्ष उमेदवारी करून लोकांनी कारकिर्द अनुभवलेल्या दोन्ही आजी माजी खासदार असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान उभे करतांना हे अपक्ष उमेदवारांनी आधी दाखवलेला उत्साह मावळतीकडे झुकू लागल्याने हवा बदलू लागली आहे.माको माको चा जप करणारेही रहस्यमयरीत्या प्रवाहातून अलिप्त ठेवण्यासाठी धडपडत असल्याने सारे मुसळ केरात जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या गोटातही फार आलबेल आहे असे नाही.लाज कशी वाटत नाही असा प्रश्न विचारून सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न फसू लागला असून मतदारच उमेदवाराला लाज कशी वाटत नाही असा प्रतीप्रश्न करतांना दिसत आहेत.

या निवडणूकीत पुन्हा एकदा भयमुक्त नाशिक आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे ऐरणीवर आले असून या मुद्यांवर राष्ट्रवादीच्या तोंडचे पाणी पळू लागले आहे.मुळात या मतदार संघात राष्ट्रवादीने उमेदवार बदलावा अशी मतदारांसह पक्ष कार्यकर्त्यांचीही इच्छा होती.तथापी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात कळ लावणार्या काका पुतण्यांमधील संघर्षाची माशी शिंकल्याने राष्ट्रावादीसमोर अन्य पर्याय नसल्याची मजबूरी निवडणूकीत दिसत आहे.परिणामी होत असलेल्या आरोपांना उत्तर देतांना दमछाक होत असतांना नाशिककरांना विकासाच्या मार्गावर धावण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आततायीपणाचे ठरू शकते असा जाणकारांचा होरा आहे.
शिवसेनेत स्थानिक पातळीवर सुरूवातीला दिसणारी नाराजी दुर करून मातोश्रीने खास निरिक्षक नाशिकमध्ये बसवल्याची चर्चा आहे.शिवसेनेच्या गडबड करणार्या नेत्यांवर मातोश्रीची नजर असल्याने सुरूवातीला उघडपणे चर्चेत असलेले आप्पा दादा नाना भाऊ झाडून कामाला लागल्याचे दिसत आहेत.या निवडणूकीत शिवसेनेने मराठा उमेदवार दिला असला तरी मराठा समाजाचे एकगठ्ठा मतदान मिळविण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार असून बहुजन समाजाची मानसिकता चाचपणे हे देखील शिवसेनेसमोरील मोठे आव्हान मानले जात आहे.
सध्या कुठल्याही परिणामांची पर्वा न करता राजकीय लढाईत आलेली वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीसाठी खर्या अर्थाने शर्यत जिंकण्यासाठी मोठा अडसर ठरत आहे.वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षाही सामान्य तरूण कार्यकर्त्यांनी प्रत्येकजण स्वतः उमेदवार आहे या भावनेतून निवडणूक हातात घेतल्याचे दिसत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात घबराट पसरली आहे.गेल्या काही दिवसात समाजकारणात झालेले ध्रूवीकरण वंचित बहुजन आघाडीच्या पथ्यावर पडत असून त्याचा थेट फटका राष्ट्रवादीला बसू शकतो असे जाणकारांचे विश्लेषण आहे.