Breaking News

डॉ. बाबासाहेबांमुळेच महत्वाचे अधिकार मिळाले


गोंदवले / प्रतिनिधी : महामानव घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपणास अनेक महत्वाचे अधिकार मिळाले असून त्यामुळे आपण हे आजचे दिवस पाहत असल्याचे प्रतिपादन आरटीओ श्री ठोंबरे यांनी गोंदवले खुर्द येथे केले.

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी असणार्‍या गोंदवले खुर्दमध्ये सामुदायिक श्रमदान करून अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 128 वी जयंती साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रमदानास सुरुवात करण्यात आली. चित्रपट अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी घेतल्या जाणार्‍या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत माण तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग नोंदविला आहे. त्यानिमित्ताने गावोगावी ग्रामस्थांच्या ऊत्साहाचे तूफान आले आहे. भल्या सकाळी गावातील ग्रामस्थ टिकाव, फावडे घेऊन श्रमदानासाठी शिवारात दाखल होत असून सुट्टीच्या दिवशी शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नोकरवर्गही या श्रमदानात सहाभागी होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 128 व्या जयंतीनिमित्त गोंदवले खुर्द येथील आंबेडकर भवनापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये ठेवून श्रमदानाच्या ठिकाणी सर्वजण पोहचले जयंती निमित्त आणि 45 दिवस चालणार्‍या या श्रमदानमध्ये सहभागी होत तिथे दोन तास श्रमदान केले. यावेळी बाबासाहेब यांच्या जीवनावरील गीते महिलांनी म्हटली. त्यानंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बुद्धवंदना म्हणण्यात आली. उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने घोषणा देत पुष्पवर्षांव केला. यावेळी आम्हां सर्व नागरिक अशीच एकी ठेवत यावर्षीचा वॉटर कप जिंकण्याच्या इराद्याने काम करत असून होणार्‍या कामामुळे आमच्या गावाला मोठा फायदा होणार असल्याचे आरटीओ ठोंबरे यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्राची अप्सरा माधुरी पवार, पाणी फाउंडेशन समन्वयक अजित पवार यांच्यासह गोंदवले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सर्वांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राची अप्सरा माधुरी पवार यांनी लोकांच्याबरोबर श्रमदान करून लोकांशी हितगुज करत संवाद साधला.