Breaking News

वारंवार बंद पडणार्‍या एसटीमुळे प्रवासी त्रस्तसातारा / प्रतिनिधी : परळी, ठोसेघर भागात गावांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त एसटी बसमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा-ठोसेघर-जांभे व सातारा- केळवली दरम्यान येणार्‍या एसटी बस वारंवार नादुरुस्त होवून बंद पडत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची ऐन परीक्षेच्या काळात तारांबळ उडत आहे.

सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणार्‍या परळी, ठोसेघर परिसरातील दुर्गम भागातील छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांमधील नागरिक दळणवळणासाठी प्रामुख्याने एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत. परंतु, गेल्या 15 दिवसांपासून या परिसरात एसटी महामंडळाकडून नादुरुस्त आणि खिळखिळ्या अवस्थेतील बस गाड्या पाठवल्या जात आहेत. त्यामुळे वारंवार या गाड्या रस्त्यातच बंद पडत आहेत.

या वारंवार बंद पडलेल्या गाड्यांची तात्पुरती दुरूस्ती करून पुन्हा त्याच गाड्या पुन्हा पाठवल्या जात आहेत. यासर्व प्रकारामुळे दुर्गम भागातील गावांमधील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, याआधी याच मार्गावर गजवडी येथे अशाच नादुरुस्त एसटी बसचा ब्रेक निकामी झाला होता. चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला होता. तर राजापुरी येथील अपघातामध्ये बसमधील प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले होते. या भागात सज्जनगड, केळवली घाट हे धोकादायक आहेत. त्यामुळे अशा प्रकारची एखादी दुर्घटना होण्याआधी एसटी महामंडळाकडून या भागात चांगल्या अवस्थेतील बस गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.