Breaking News

तिरुपती बालाजी देवस्थानकडे 9 हजार किलोपेक्षा जास्त सोने


हैद्राबाद : जगातील श्रीमंत देवस्थानांमध्ये गणना होत असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानकडे 9 हजार किलोपेक्षा जास्त सोने आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान (टीडीडी)ने च्या दिलेल्या माहितीनुसार देवस्थानचे 7,235 किलो सोने दोन राष्ट्रीयकृत बँकांच्या दोन वेगवेगळ्या योजनांमध्ये ठेवले आहे. टीटीडीच्या कोषागारात 1, 381 किलो सोने आहे. हे सोने 3 वर्ष आधी पंजाब नॅशनल बँकेत ठेवले होते. त्याची मुदत पूर्ण झाल्याने गेल्या महिन्यातच देवस्थानला परत मिळाले आहे. आता हे सोने कुठे गुंतवायचे याबाबत विविध योजनांची माहिती घेणे सुरु आहे. टीटीडीने म्हटले आहे की ज्या योजनेत जास्त परतावा मिळेल तिथे हे सोने ठेऊ. याशिवाय टीटीडीच्या कोषागारात 553 किलो सोने आहे. ते भक्तांकडून दान स्वरूपात मिळालेल्या किरकोळ दागिन्यांच्या स्वरूपात आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, आधी टीटीडी त्यांच्याकडील सोन्याची माहिती सार्वजनिक करणे टाळत होते. पण गेल्या महिन्यात तामिळनाडूत निवडणूक आयोगाने टीटीडीचे सोने पकडल्यानंतर टीटीडी त्यांच्याकडील सोन्याची माहिती सार्वजनिक करते आहे. या सोन्याशी संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर 2 दिवसांनी हे सोने टीटीडीला परत मिळाले होते. टीटीडीने 2016 ला पंजाब नॅशनल बँकेत 1,311 किलो सोने ठेव योजनेत ठेवले होते. हे सोने 70 किलो सोन्याच्या व्याजासह पंनॅबँकेने टीटीडीला परत केले आहे. टीटीडीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे 5,367 किलो सोने स्टेट बँकेत आणि 1,938 किलो सोने इंडियन ओव्हरसीज बँकेत जमा आहे. गेल्या दोन दशकांपासून टीटीडी त्यांच्याकडचे सोने वेगवेगळ्या राष्ट्रीय बँकांच्या ठेव योजनेत ठेवतं आहे. रिजर्व बँकेने 2015 ला ‘स्वर्ण मुद्रीकरण योजना’ घोषित केल्यानंतर, बँकांमध्ये ठेव योजनेत जमा सोन्याचे व्याज सोन्यात देण्याची घोषणा झाल्यानंतर, टीटीडी त्यांच्याकडचे सोने वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवीत ठेवत आहे. टीटीडीने दिलेल्या माहितीनुसार देवस्थानाचे 12 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या बँकांमधें मुदत ठेवीत जमा आहेत. 

तसेच बँकांमध्ये ठेव ठेवलेल्या सोन्यावर टीटीडीला दरवर्षी व्याजात 100 किलो सोने मिळते. असे असले तरी देवस्थानच्या संपत्तीचा हिशेब लावणे अशक्य आहे. कारण, देवस्थानच्या उत्सव मिरवणुकीच्या मूर्तींनादेखील सोने - चांदी, हिरे-माणकं जडलेले आहेत. त्यांचीच किंमत शेकडो कोटीत आहे. तसेच याठिकाणी केस अर्पण करण्याची प्रथा आहे. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्तगण मंदिरात केस अर्पण करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार मंदिरात दररोज एक टनहून अधिक केस गोळा होतात. संस्थान या केसांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांना विक्री करते. हे केस विग आणि हेअर एक्सटेंशन तयार करण्यासाठी वापरले जातात. संस्थानाला केसांच्या लिलावातून तब्बल 60 लाख डॉलर (42.03 कोटी रूपये) मिळतात.