Breaking News

निकाल अनपेक्षित पण जनतेचा कौल मान्य : शरद पवार


मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला अनपेक्षित असा आहे. तरी लोकांनी जे मतदान केलं त्यांचे आभार मानतो, कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांचे धन्यवाद देतो. लोकांचा निर्णय मान्य आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. मागील निवडणुकीत जे यश भाजपाला मिळालं होतं त्यामधील मताधिक्य यावेळी कमी झालं आहे. आमच्या पक्षातर्फे निकालांची चिंता न बाळगता दुष्काळग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत करण्याची भूमिका आहे. अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत असेही पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. तर मावळ मतदारसंघात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. या पराभवावर शरद पवार यांना प्रश्‍न विचारला असता, तो मतदारसंघ जिकूंन येणारच नव्हता. याउलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिथे चांगली मेहनत केली, असे शरद पवार म्हणाले आहेत. ‘मी निवडणूक लढणार नव्हतोच. 2014 मध्ये मी निवडणूक लढलो नव्हतो. त्यामुळे 2019 साली देखील निवडणूक लढणार नाही, असा मी निर्णय घेतला होता. पक्षामध्ये काही मताधिक्य होते. त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवेल असे म्हटले होते. मी निवडणूक सोडली, असे म्हणण्यात काही तथ्य नाही. पार्थची जी जागा होती, ती जागा आम्हाला न येणारी जागा होती. त्यामुळे न येणार्‍या जाग्यावर निवडणूक लढवून बघावी, असा निर्णय आम्ही घेतला होता. गेल्या मावळमध्ये आम्ही जिंकलो नव्हतो. तिथे आमच्या कार्यकर्त्यांनी बराच प्रयत्न केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यभरात प्रचारसभा घेऊन भाजप सरकारला धारेवर धरले होते. परंतु, या सभांचा भाजपवर फार काही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालेला नाही. दरम्यान मनसे विषय प्रश्‍न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, ‘मनसेचा उमेदवार असता तर राज्यात वेगळी परिस्थिती असती. याशिवाय भाजपला इतक्या जागांवर यश मिळेल, ते अनपेक्षित होते.